रशियाचा हेर असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ बर्लिन
जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये मागील महिन्यात रशियाच्या दूतावासात एका अधिकाऱयाच्या मृत्यूनंतर त्याच्या ओळखीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रशियाच्या दूतावासाबाहेर मृत आढळलेला अधिकारी रशियाची गुप्तचर यंत्रणा एफएसबीचा अंडरकव्हर एजंट होता असे जर्मन सुरक्षा सेवांचे मानणे आहे.
अधिकाऱयाचा मृतदेह 19 ऑक्टोबर रोजी सकाळी मिळाला होता. रशियाच्या दूतावासाच्या इमारतीच्या वरील मजल्यावरून कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला होता. पण तो कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तत्वांच्या कारणांमुळे या दुःखद घटनेवर टिप्पणी करू इच्छित नसल्याचे रयिशाच्या दूतावासाने म्हटले होते. राजनयिकाचा मृतदेह रशियात पाठविण्याशी संबंधित सर्व औपचारिकता जर्मनीच्या कायदा, अंमलबजावणी आणि वैद्यकीय अधिकाऱयांसोबत पूर्ण करण्यात आल्या आहेत. या या दुःखद घटनेसंबंधी पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांमध्ये छापण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या मानतो असे रशियाकडून म्हटले गेले आहे.
मृत्युमुखी पडलेल्या राजनयिकाला बर्लिनमध्ये रशियाच्या दूतावासात सेकंड सेक्रेटरी म्हणून मान्यता देण्यात आली होती. परंतु तो रशियाच्या एफएसबीचा अंडरकव्हर ऑफिसर होता असे जर्मन सुरक्षा अधिकाऱयांचे मानणे आहे. रशियाच्या दूतावासाने या अधिकाऱयाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता.









