गोडोली / प्रतिनिधी
“कोव्हीड-१९ सारख्या आजाराचा प्रादुर्भावामुळे गावापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर या आजाराचे दूरगामी परिणाम होत आहेत.या कालखंडात संस्था ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राची शिक्षण प्रक्रिया गतिमान करण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेच, तथापी आज कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्था सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून महाराष्ट्राच्या विविध भागात ३८ ठिकाणी रयत सेवक आणि विद्यार्थ्यांसाठी कोव्हीड मदत केंद्रांची उभारणी करीत आहे,”असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील हे उपस्थित होते.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यावर लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या समताधिष्ठित समाज रचनेच्या विचारांचा मोठा प्रभाव होता, असे स्पष्ट करून शरद पवार पुढे म्हणाले,”येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करून समाजाच्या विकासासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्याचा विचार कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या कृतीतून समाजाला दिला आहे.आज कोव्हीड-१९ प्रादुर्भावाने संपूर्ण जग वेठीस धरले आहे.यावेळी सकारात्मक विचार करून येणाऱ्या प्रत्येक संकटावर आपण सर्वांनी प्रयत्नपूर्वक मात केली पाहिजे.हाच संस्कार आणि विचार कर्मवीरांनी आपल्याला दिला आहे,”असे गौरवोद्वार त्यांनी काढले.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एकमेव साधन आहे,त्यामुळे याच कार्याला महत्त्व देऊन रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात डोंगरदऱ्यात बहुजनांच्या मुलांना अत्याधुनिक शिक्षणाची दालने खुली करुन शिक्षण हे शेवटच्या घटकापर्यंत पोहचवले. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था रयत शिक्षण संस्थेने केली आहे. आज कोरोनाच्या संकटातून जात असताना समाजाला मदत केली पाहिजे, आलेल्या संकटावर मात केली पाहिजे हीच सामाजिक बांधिलकीची भूमिका घेऊन संस्थेने सर्व सेवकांच्या मदतीने मुख्यमंत्री निधीसाठी २ कोटी ७५ लाख रुपये मदत केली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था झूम अॅपच्या माध्यमातून करणे हा विज्ञानाचा चमत्कारच आहे. हा विचार अण्णांच्या संस्काराचा भाग आहे. आज अण्णा आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा विचार अतिशय मजबूत आहे. शिक्षणापासून कोणतीही पिढी वंचित राहू नये,या भूमिकेतून आपण सर्वांनी काम केले पाहिजे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील म्हणाले, “कोव्हीडचे संकट खूप मोठे आहे.मात्र कर्मवीर अण्णांनी सामाजिक क्षेत्रात काम करताना येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यास शिकवले. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.दुर्गम भागात, डोंगरदऱ्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था केली आहे. आज प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन होत नसले तरी ऑनलाईनच्या माध्यमातून २ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत संस्था पोहोचली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचे आव्हान संस्था निश्चितच पेलेल, याची मला खात्री आहे. कोरोना आला आम्ही थांबलो नाही, हरलो नाही. कोरोनाबरोबर जात शिक्षण द्यायचे आहे. हे ब्रीद घेऊन आम्ही वाटचाल करीत आहोत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी केले.आभार सहसचिव प्राचार्य डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी व्यक्त केली. संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. या कार्यक्रमास झूम ॲपच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर,ॲड. भगीरथ शिंदे,ना. दिलीप वळसेपाटील, उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सर्व मान्यवर सदस्य, शाखाप्रमुख,जनरल बॉडी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रात ३८ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या कोव्हीड माहिती व मदत केंद्राचे लोकार्पण झाल्याचे खा.शरद पवार यांनी जाहीर केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









