कोरोनामुक्तीच्या दिशेने पावले टाकणाऱया रत्नागिरी जिल्हय़ात एकाच आठवडय़ात सलग दोन धक्के मिळाल्याने कोकणी माणसासमोर नवे आव्हान उभे राहीले आहे. नियम व सूचनांचे पालन करण्याकरता प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीतही कोरोनाची ही वाढती व्याप्ती आताच न रोखल्यास मोठय़ा संकटाला निमंत्रण देणारी ठरेल.
देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना कोकणामधील परिस्थिती मात्र नियंत्रणात होती. सिंधुदुर्ग जिह्यातील एकमेव व रत्नागिरीतील पहिल्या रुग्णाचा अहवालही निगेटिव्ह आल्याने नागरिक व प्रशासनाला दिलासा मिळाला होता. मात्र कोरोनामुक्तीच्या दिशेने चाललेल्या रत्नागिरीला राजिवडय़ात आढळलेल्या नव्या रुग्णामुळे पहिला ब्रेक लागला. यातून सावरण्याच्या आतच शहरानजीकच्या साखरतर येथे आणखी एक महिला पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्हा हादरला आहे. यातून जिल्हावासियांना सावधानतेचा कडक इशारा मिळाला आहे. आता गंमत म्हणून, जात-धर्माची ढाल पुढे करून किंवा राजकीय मायलेज म्हणूनही थोडीशी चूकसुध्दा सर्वांनाच महागात पडू शकते. सुजाण नागरिकांसह प्रशासनाने कोणालाही कोणत्याही त्रुटीसाठी माफ करण्याची वेळ आता संपली आहे.
एप्रिलचा पहिला आठवडा जिह्यासाठी कोरोनामुक्तीची चाहूल दाखवणारा ठरला. मात्र हा आनंद अल्पकाळच टिकला. तबलिगीसाठी मुबईहून रत्नागिरीत आलेला एक नागरिक शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला, त्यानंतरच तीनच दिवसांत म्हणजे मंगळवारी आणखी एक महिलाही पॉझीटीव्ह आढळली. प्रशासनाने जारी केलेली संचारबंदी, स्वतःहून तपासणीसाठी पुढे येण्याचे केलेले आवाहन व अन्य नियमांचे बहुतांश रत्नागिरीकरांकडून काटेकोर पालन होत असतानाही काही मुठभर लोकांच्या बेफिकीरी व उद्दामपणामुळे जिल्हा पुन्हा पुन्हा संकटात ढकलला जात असल्याचे चित्र आहे.
‘अस्मिता’च लॉकडाऊन करण्याची गरज
जिल्हय़ात पहिला रूग्ण सापडल्यानंतरच प्रशासन व पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली. जिह्यांच्या सिमांवरची नाकाबंदी अधिक भक्कम करण्यात आली. रेल्वे रुळावरून कोकणात दाखल होण्याचे प्रकार हाणून पाडल्यानंतर हा मार्गही नियंत्रणात आला. समुद्रमार्गे परतण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे. अत्यावश्यक वाहतुकीसाठी ऑन-लाईन पासचे वितरण करण्यात आले आहे. होम व इन्स्टीटय़ुशनल क्वारंटाईनबाबत काटेकोर अंमलबजावणी सुरु आहे. अशावेळी नागरिकांनीही शासनाकडून प्राप्त सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. आपापल्या धार्मिक, प्रादेशिक, राजकीय अस्मिता प्रामाणिकपणे ‘लॉक डाऊन’ करून ठेवण्याची नितांत गरज आहे. अन्यथा येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही.
रत्नागिरी शहरात राजिवडय़ामध्ये कोरोना रुग्ण आढळल्यानंतर तपासणीसाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱयांना झालेला अटकाव ही फारच गंभीर बाब आहे. त्यापाठोपाठ दोन दिवसांत महिलेला अडवल्यावरून जमावबंदीचा भंग करत रस्तावर आलेला जमाव व पोलिसांशी घातलेली हुज्जतही तितकीच काळजीची आहे. सामाजिक व शासकीय बाबतीत समुहाचा दबाव कोरोनाविरुध्दच्या लढाईत चालणार नाही याचे तरी भान ठेवायलाच हवे. अशा प्रकारची संवेदनाशील परिस्थिती हाताळताना प्रशासनाची होणारी तारांबळ आणि कसरत समाज व लोकप्रतिनिधींनाच कमी करावी लागणार आहे. समाज नेते व स्थानिक लोकप्रतिनिधींनी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात अग्रभागी रहावे, आरोग्य व सफाई कर्मचार्यांसह स्वयंसेवक म्हणून दिवसभर राबावे, भुकेलेल्याला अन्न, निराधाराला घर देण्याचा प्रयत्न करावा.. मोठेपणाच नव्हे मंडळी समाधानही मिळेल!
तरूणाईचा संयम महत्वाचा
काही नाठाळ तरुणांचीही प्रशासनासमोर डोकेदुखी बनत आहे. विनाकरण फेरफटका मारणे, समाज माध्यमावर अफवा पसरवणे यासह 20-25 च्या गटात एकत्र येत क्रिकेट खेळणे या बाबी त्यांना टाळाव्या लागतील. फेसबुकवरून पाठवलेल्या आक्षेपार्ह संदेशाबाबत रत्नागिरीत एक गुन्हा दाखल झाला आहे. उगाचच एकत्र येत आरडा-ओरडा करणे व जमावबंदीचा भंग केल्याप्रकरणी चिपळूणात काही युवकांवर कारवाई करण्यात आली. सध्या पोलीस दल समजुतीने वागत आहे. इशारा देत आहे. यावरच युवकांनी स्वत:वर नियंत्रण ठेवले पाहिजे. अन्यथा नाईलाजाने कठोर भुमिका घेतल्यास या मुलांसह त्यांच्या पालकांवरही गुन्हे दाखल झाल्यास पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. असे होऊ न देण्यातच त्यांचे व समाजाचे हित आहे. तरूणाईने आपली उर्जा पोलिसांच्या जोडीने सकारात्मक कार्यासाठी वापरण्याच्या पर्यायावर विचार व्हावा.
मुंबईतून धडा शिकूया!
किरकोळ म्हणून दुर्लक्ष केल्याने झालेल्या छोटय़ा-छोटय़ा चुकांचे गंभीर परिणाम काय होता याचे उदाहरण राजधानी मुंबई आपल्याला दाखवत आहे… रत्नागिरी जिल्हा हा बराचसा मुंबईवरच अवलंबून आहे, तेथील अनुकरण नेहमीच जिल्हय़ातही होताना दिसते… मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाला असताना ‘आम्हा काय त्याचे’ असे म्हणत त्याच मार्गावर चाललेला आपला प्रवास आत्ताच थांबवावा लागेले…… तेथील अनुभवातून आपल्या प्रत्येकालाच शिकावे लागेल.. स्वत:ला बदलावे लागेल…. अन्यथा कधीही भरून निघणार नाही असे नुकसान सोसावे लागेल. असे घडल्यास समाजच काय आपण स्वत:ही स्वत:ला माफ करू शकणार नाही.
विश्वेश जोशी








