संपूर्ण भारताचे दिसणार प्रतिबिंब : मंत्री उदय सामंत यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकणात पर्यटन विकसित करण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ‘ग्लोबल व्हिलेज’ हा प्रकल्प तब्बल शंभर एकर जागेत साकार होणार आहे. यामुळे रत्नागिरी जिल्हा पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे. सध्या या प्रकल्पाचे नियोजन सुरू असून लवकरच याची सविस्तर माहिती देण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. या ‘व्हिलेज’मध्ये संपूर्ण भारताचे प्रतिबिंब असेल, असेही त्यांनी पुढे सांगितले.
रत्नागिरी जिल्हय़ातील आरेवारे बीच परिसरात 15 एकर जागेत प्राणीसंग्रहालय साकारणार आहे. हा प्रकल्प 50 कोटीचा आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ‘बर्ड पार्क’ त्यानंतर प्राणीसंग्रहालय होणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
रत्नागिरी, सिंधुदुर्गात टुरिझम इन्स्टिटय़ूट
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे टुरिझम इन्स्टिटय़ूट सुरू करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटन क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील. ‘ग्लोबल व्हिलेज’ हा प्रकल्प पर्यटन विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. शंभर एकर जागेमध्ये संपूर्ण देशाचे दर्शन होईल. याचे नियोजन सुरू असून याबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती सामंत यांनी दिली. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









