बुधवारी 17 नवे पॉझिटिव्ह रुग्ण : एकही मृत्यू नाही : पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेले काही दिवस सातत्याने घटत असताना बुधवारी या संख्येने अचानक छोटी उसळी घेतली आहे. बुधवारी जिल्हय़ात 17 नवे कोरोना रुग्ण आढळले. एकाही मृत्यूची नव्याने नोद न झाल्याचा दिलासा असला तरीही नव्या रुग्णांच्या संख्येतील वाढ सावधगिरीची सूचना मानली जात आहे.
बुधवारी आरटीपीसीआर चाचणीत मंडणगडात 2, दापोली व चिपळुणात प्रत्येकी 1 तर रत्नागिरीत 3 असे 7 रुग्ण आढळले. अँटीजेन चाचणीत दापोली व रत्नागिरीमध्ये प्रत्येकी 3 तर संगमेश्वर व खेडमध्ये प्रत्येकी 2 असे 10 नवे रुग्ण आढळले आहेत. नव्या 17 रुग्णांमुळे जिह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 8 हजार 555 वर पोहोचली आहे. बुधवारी 11 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8 हजार 73 झाली आहे.
जिह्यात कोरोनाचे प्रमाण वेगाने कमी होत होते. बुधवारी ही संख्या काही प्रमाणात वाढली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळत असले तरीही नागरिकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम कटाक्षाने पाळावे, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढता जनसंपर्क व हवामानातील बदलांचा कोरोना लढय़ावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.









