मरकजहून परतलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझीटीव्ह
रत्नागिरी / प्रतिनिधी
गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथील एकमेव कोरोना रूग्ण बरा होऊन रूग्णालयातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असतानाच रत्नागिरीत कोरोनाचा नवा रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीजवळच्या निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी होऊन तबलीक शिकवणुकीसाठी रत्नागिरीत आलेल्या मुळ मुंबईतील व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी शहरातील शिवखोल-राजीवडा येथे तो वास्तव्यास होता. या घटनेनंतर राजीवडा परिसरा सील करण्यात आला असून त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध व तपासणी सुरू केली आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की , दिल्लीतील कार्यक्रमाला उपस्थित राहिलेली 59 वर्षाची ही व्यक्ती मुंबईत आली. तेथून तबलिक जमातीच्या कामासाठी 18 मार्च रोजी काही मंडळी रत्नागिरीतील राजीवडा येथे आली. मुंबई पोलिसांकडून याबाबतची माहिती मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यात आला. रूग्णालयात दाखल करून या व्यक्तीची कोरोना चाचणी केल्यानंतर संबधीत व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे दिसून आले. यामुळे बाधित व्यक्ती आढळलेल्या ठिकाणापासून 3 किमी. चे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले असून त्यापुढील 2 किमीचे क्षेत्र बफरझोन म्हणून विशेष नियंत्रणाखाली ठेवण्यात आले आहे.
परिसरातील सर्वाची तपासणी
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी रूग्ण रहात होता त्या परिसरात रहाणाऱया सर्व नागरिकांची यादी करून प्रत्येकाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची तपासणी होणार आहे. या पूर्वी 30 लोकांची यादी हाती आली होती, त्यात आणखी 8 लोकांची वाढ झाली आहे. या सर्वांच्या तपासण्या होणार आहेत. राजीवडा परिसरात या कालावधीत एकाचा मृत्यू झाला होता. तो नेमका कशामुळे झाला याचीही तपासणी करण्यात येईल.
14 दिवस कठोर नियंत्रण
कोरोनाग्रस्त सापडलेल्या क्षेत्रापासून प्रतिबंधित क्षेत्र आणि बफर क्षेत्र यांबाबतची रचना पोलीसांकडून केली जात आहे. पुढील 14 दिवस रत्नागिरीकरांना विशेष नियंत्रणात रहावे लागणार आहे. यापुढे कोणत्याही व्यक्तीला सुट दिली जाणार नाही. रत्नागिरी जिह्यात कोठेही बाहेरून आलेली एखादी व्यक्ती असेल तर त्यानी स्वतःहून याबाबतही माहिती प्रशासनाला द्यावी. अन्यथा संबंधित व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येईल, असे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
तबलिक गटातून आलेल्यांची संख्या 50 वर
19 मार्च रोजी तबलिक जमातीचे 15 जण नवी मुंबईतून व 15 रोजी बांद्रा येथून 14 जण तर मुंबईतून आणखी 19 जण त्यापुर्वी रत्नागिरीत जिल्हय़ात दाखल झाले आहेत. या 48 लोकांशिवाय मुंबईतून आणखी काही जण जिह्यात आल्याची माहिती मिळत आहे. यापैकी कोणीही दिल्लीतील कार्यकमाला उपस्थित नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. रत्नागिरी जिह्यातून 2 जण जळगाव येथे तबलिक जमातीसाठी गेले आहेत. तेथील पोलीस अधीक्षकांना या प्रकाराची कल्पना देण्यात आली आहे. त्यांनी या लोकांना क्वारंटाईन करून ठेवले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.
रत्नागिरी-सिधुदुर्गातील 51 जणांचा बाधीतासोबत प्रवास
राजीवडा येथे मुंबईतून आलेली व्यक्ती कोरोनाबाधित आढळली आहे. त्या व्यक्तासह त्याला आश्रय देणाऱया विरूध्द गुन्हा दाखल करण्याचा विचार प्रशासनाने केला आहे. ही व्यक्ती 18 मार्च रोजी कोचीवली एक्सप्रेसमधून रत्नागिरीत उतरली. याडब्यातील अन्य प्रवाशांचीही तपासणी केली जाणार आहे. यामध्ये 17 जण रत्नागिरीत तर 10 जण चिपळुणमध्ये उतरले. शिवाय 24 जण सिंधुदुर्गात उतरले होते. दोन्ही जिल्हय़ातील या 51 जणांची यादी हाती आली असून या सर्वाची तपासणी केली जाणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.









