प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यस्तरीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेंतर्गत पुरुषांच्या अ गटातील साखळी सामन्यांमध्ये रत्नागिरीच्या संघाने रायगडवर एक गुणाने मात केली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यातील विजय संघ सोलापूर येथे होणाऱया राज्य स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्याठिकाणी उपउपांत्य फेरीचे सामने होतील.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर हा सामना झाला. साखळी स्पर्धेचे उद्घाटन क्रेडाईचे अध्यक्ष नित्यानंतद भुते, छोटू देसाई अपॅडमीचे अध्यक्ष गजेंद्र पाथरे, उपजिल्हाधिकारी पोपट उमासे, स्पर्धा निरीक्षक राष्ट्रीय पंच आशिष पाटील, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, खो-खो संघटनेचे उपाध्यक्ष विनोद मयेकर, आंतरराष्ट्रीय पंच समीर काबदुले, राष्ट्रीय प्रशिक्षण पंकज चवंडे यांच्यासह सर्व खो-खो प्रशिक्षक आणि मार्गदर्शक उपस्थित होते.
रत्नागिरीतील खेळाडूंनी राज्यस्तरावर चांगली कामगिरी करावी असे प्रतिपादन क्रेडाईचे अध्यक्ष नित्यानंद भूते यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश कळंबटे यांनी केले. रायगड संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम संरक्षण घेतले. वेगवान आक्रमणामुळे रत्नागिरीने रायगडचे दहा गडी बाद केले. तर रायगडला रत्नागिरीचे 9 गडीच बाद करता आले. मध्यंतराला रत्नागिरीकडे 1 गुणांची आघाडी होती. मात्र उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनामुळे विरोधी संघाकडे आघाडी असतानाही रायगडने सामना बरोबरीत राखला. जादा डावांमध्ये रायगडला विजयासाठी 11 गडी बाद करण्याचे आव्हान होते. मात्र शेवटच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या सामन्यात रायगडला पराभवा सामना करावा लागला.









