आमदार योगेश कदम यांच्या प्रशासनाला सूचना
नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहणार नाही याकडे लक्ष द्या
प्रतिनिधी / खेड
सलग तीन दिवस झालेल्या परतीच्या पावसाने दापोली विधानसभा मतदार संघातील तीनही तालुक्यातील भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष घटनास्थळी जावून पंचनामे करण्याच्या सूचना आमदार योगेश कदम यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिल्या आहेत. नुकसान भरपाईपासून कोणीही वंचित राहणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचेही सूचित केले आहे.
मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे तीनही तालुक्यात भातपिकांची मोठी नासाडी झाली आहे. धो-धो कोसळलेल्या पावसामुळे भातपिके आडवी झाली आहेत. बहुतांश ठिकाणी कापलेली भातपिके पाण्यात भिजली असून पिकांची नासाडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार योगेश कदम यांनी तीनही तालुक्यातील शेती नुकसानीचे पंचनामे प्रत्यक्ष जागेवर जावून करण्याच्या सूचना सर्वच प्रशासकीय यंत्रणांना केल्या आहेत. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून भरपाई सत्वरतेने मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, सरपंच, तलाठी, प्रशासक यांनी संबंधित यंत्रणांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे काम हाती घेण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच यासाठी सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील पुढाकार घेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सहकार्य करायला हवे. नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाहीत, याची पुरेपूर दक्षता घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत.









