वार्ताहर / राजापूर
अवकाळी पाऊसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झालेले असताना शासनाने जाहिर केलेली नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने यावर्षी भात खरेदीच्या दरामध्ये अठरा रूपयांनी वाढ करत दिलासा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गतवर्षी भातखरेदीला प्रति क्विंटल 1 हजार 850 रूपये दर होता. त्यामध्ये यावर्षी अठरा रूपयांनी वाढ होताना प्रतिक्विंटल 1 हजार 868 रूपये एवढा जाहीर झाला आहे. या भात खरेदीसाठी राजापूर खरेदी-विक्री संघ सज्ज झाला असून संघाच्या राजापूर आणि पाचल येथील केंद्रावर ही खरेदी करणे सुरू करण्यात आल्याची माहिती संघाचे व्यवस्थापक कानविंदे यांनी माहिती दिली.
लहरी पाऊस, मनुष्यबळाची कमतरता, मजूरी आणि यांत्रिक साधनांचे वाढते दर आदींमुळे भातशेती तोट्यात असल्याचे बोलले जाते. पावसाळी हंगामामध्ये राबूनही त्या तुलनेमध्ये उत्पन्न मिळत नसल्याने अनेकाकडून भातशेतीकडे पाठ फिरविली आहे. त्यातून, यापूर्वी हिरवेगार असलेले भातशेतीचे मळे अलीकडे पडीक असल्याचे चित्र दिसत आहे. भातशेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱयांनी भातशेती बंद करून रेशन दुकान तसेच बाजारपेठेतून तांदूळ खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. अशा स्थितीतही काही शेतकरी आजही भातशेती करतानाचे आश्वासक चित्र आहे. शेतामध्ये पिकणारे भात शासनाकडून खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकणाऱ्या भातातून उत्पन्न मिळत आहे. मात्र, यावर्षी आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळ त्यामध्ये आलेला नद्यांना पूर यामुळे भातशेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यातून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून गेले. या स्थितीमध्ये भातखरेदीच्या दरामध्ये केवळ अठरा रूपयांची वाढ झाली असलेली तरी, आपद्ग्रस्त स्थितीमध्ये ही वाढ शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.
गतवर्षी भात खेरदीचा 1 हजार 850 रूपये प्रतिक्विंटल दर होता. त्याचवेळी शासनाकडून प्रतिकिलो सात रूपये बोनस असा देण्यात आला होता. मात्र, यावर्षी शासनाकडून प्रतिक्विंटलचा दर निश्चित केला आहे. मात्र, बोनसबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे यावर्षी गतवर्षीप्रमाणे भातखरेदीला प्रतिकिलो वा प्रतिक्विंटल बोनस मिळणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
डिजीटल कारभारामुळे भातखरेदी केल्यानंतर खरेदी-विक्री संघाकडून शेतकऱ्याला दिला जाणारे त्या भाताचे पैसे रोखीमध्ये न देता त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. त्यामुळे संघाकडे भात विक्री करताना शेतकऱ्यांनी सात-बारा उतारा, आधारकार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स सोबत घेवून यावी असे आवाहन राजापूर खरेदी-विक्री संघातर्फे करण्यात आले आहे.









