मारूतीमंदीर येथील पे ऍन्ड पार्कच्या विकासानंतर आणखीन 6 ठिकाणी सुविधा एप्रिल महिन्यापासून सुविधा लागू
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या पार्कींगच्या जागांवरील अस्ताव्यस्त वाहन पार्कींगला शिस्त लावण्यासाठी नगर परिषद स्तरावरून आता ‘पे ऍन्ड पार्कींग’ चा विकासाला प्रारंभ झाला आहे. मारुती मंदिर पाठोपाठ आणखी इतर 6 ठिकाणे ‘पे अँड पार्क’ म्हणून विकसित केली जाणार असल्याचे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी यांनी सांगितले.
येत्या एप्रिल महिन्यापासून शहरात एकूण 7 ठिकाणी ही सुविधा सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शहरात अनेक महत्वाच्या नाक्यांवरील असलेल्या जागांवर वाहने पार्कींग केली जातात. पण त्याठिकाणी अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असतात. त्यामुळे या प्रकाराला शिस्त लावण्यासाठी न.प.मार्फत ही कार्यवाही केली जात आहे. अलिकडेच मारुती मंदिर येथे नगर परिषदेमार्फत पे ऍन्ड पार्क विकसित करण्यात आलेला आहे. त्या पे अँड पार्क क्षेत्राचे उद्घाटन झाले आहे.
त्यानंतर आता पुढील पार्कींगची ठिकाणे असलेल्या प्रधान पोस्ट ऑफिससमोरच्या जागेत, साळवी स्टॉप येथे जलतरण तलावाजवळच्या मैदानात, आठवडा बाजार, स्वा. लक्ष्मी चौक, पऱयाची आळी, रामआळीतील सुपर मार्केटजवळ देखील ‘पे अँड पार्क सुरू होणार असल्याचे नगराध्यक्ष बंडय़ा साळवी यांनी सांगितले आहे. रत्नागिरी नगर परिषदेतर्फे ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पार्कींगसाठी असा राहणार दरभाडे
या पार्कींगच्या जागेवर दुचाकीसाठी 5 रुपये, तीनचाकीसाठी 10 रुपये, कारसाठी 20 रुपये, चारचाकी टेम्पोसाठी 40 रुपये आणि ट्रक, बससाठी 100 रुपये आकारले जाणार आहेत. हा आकार प्रति तीन तासांसाठी आहे. सध्या या सर्व जागांवर मोफतपणे वाहने उभी केली जात आहेत.









