प्रतिनिधी / रत्नागिरी
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परीषदेच्या निकषाप्रमाणे पायाभूत सुविधांच्या पाहणी नुकतीच परीषदेच्या पथकाने केली असून अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी आवश्यक इमारतीचे काम गतीने चालू होणार आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे वर्ग पॉलिटेक्निकच्या नवीन विस्तारीत इमारतीमध्ये सुरु होणार असल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य औ.म. जाधव यांनी दिली.
नवीन विस्तारीत इमारतीचे क्षेत्र १९०५ स्क्वेअर मीटर असून नवीन बांधकाम उपलब्ध होत नाही, तोपर्यंत या इमारतीत प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे वर्ग भरणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली. नव्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य १, प्राध्यापक ६, सहयोगी प्राध्यापक १५, सहाय्यक प्राध्यापक ४३ शिक्षकेतर कर्मचारी ५० असे एकूण ११५ कर्मचारी असणार आहेत. पहिल्या वर्षी यापैकी २९ पदांची आवश्यकता आहे. दरम्यान अभियांत्रिकी महाविद्यालयाबरोबरच तंत्रनिकेतन देखील सुरुच राहणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे कोकणातून दर्जात्मक अभियंते तयार होतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते. त्यानुसार कार्यवाही युद्धपातळीवर करण्यात येत असल्याचे पाचार्यानी सांगितले.









