वहूर गावात पाच कावळे मृतावस्थेत सापडले, नागरिक भयभीत
प्रतिनिधी / खेड
‘बर्ड फ्लू’चे हे लोन आता महाडमध्ये पोहोचले असून तालुक्यातील वहूर गावात शुक्रवारी सकाळी पाच कावळे मृतावस्थेत तर एक कावळा तडफडत असल्याचे आढळून आला आहे. या कावळ्यांचा मृत्यू नेमका बर्ड फ्लूमुळेच झाला का ? याची तपासणी केल्यानंतरच नेमक्या कारणांचा उलगडा होणार आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
राज्यातील विविध भागातील ‘बर्ड फ्लू’चे हे लोन आता महाड तालुक्यात येवून पोहोचले आहे. महाड तालुक्यातील वहूर गावात शुक्रवारी सकाळी पाच कावळे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ अनंत नवले यांच्या घराशेजारी मृतावस्थेत आढळून आले. सरपंच जितेंद्र बैकर यांनी हि माहिती तत्काळ तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली असता त्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि या पक्ष्यांचे नमुने ताब्यात घेतले आहेत. कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाला आहे का अन्य काही कारण आहे याचा तपास केला जाणार आहे.









