प्रतिनिधी / दापोली
15 जानेवारी रोजी होणाऱ्या 42 ग्रामपंचायत निवडणुकीकरिता दापोलीतील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. याचा आढावा तहसीलदार वैशाली पाटील व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी नुकताच मतमोजणी केंद्रावर जाऊन घेतला.
15 जानेवारी रोजी 106 मतदान केंद्रांवर 42 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहे. याकरिता पालघर जिल्ह्यातून दापोली 41 पोलीस कर्मचारी व 2 पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच 34 गृहरक्षक दलाचे जवान व 27 स्थानिक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी या बंदोबस्त करिता नियुक्त करण्यात आलेले आहेत.
शहरातील सोहनी विद्या मंदिरमध्ये जेथे प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे तो नर्सरी रोड चर्च जवळ बंद करण्यात येणार आहे. यामुळे नर्सरी रोडवरून जाणाऱ्या विद्यापीठाची कर्मचाऱ्यांनी लाल कट्टा येथून बाहेर पडणारा रस्त्याचा वापर करावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. शिवाय सोहनी विद्यामंदिरकडे आजाद मैदान येथून येणारा जोगनदी पार करून येणारा साकव देखील मतमोजणीच्या वेळी बंद करण्यात येणार आहे.
मतमोजणी केंद्रात येणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांची वाहने नर्सरी रोडवर आणू नयेत. त्यांनी वाहने आझाद मैदान येथे उभी करावी व पायी चालत नर्सरी रोड वर यावे. मराठा हॉस्टेल येथे सर्व ग्रामस्थांची उभे राहून मतमोजणी प्रक्रिया ऐकण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या करिता येथे ध्वनिक्षेपक बसवण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.









