जिल्ह्यात कोरोना सेंटरमध्ये 50 टक्के बेड रिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फुले यांची माहिती
ग्रामीण भागात विशेष लक्ष ठेवणार: जि.प. सीईओ
प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यात महिनाभरापूर्वी 67 टक्के ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरले होते. मात्र आता हे प्रमाण 20 टक्क्यांवर आले असून ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. तसेच इतर 50 टक्के बेड जिह्यात रिक्त असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. असे असले तरी ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात नाही, ही बाब समोर आल्याने आता येथे विशेष लक्ष दिले जाईल. ग्रामस्थांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कोरोना संख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग दिवस-रात्र काम करत आहे. प्रशासनाकडूनही विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी ग्रामीण भागात नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याची बाब समोर आली आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्ह रेट 7 ते 8 टक्के आहे. गेल्या महिन्यात हा रेट 15 ते 16 टक्क्यांवर गेला होता. ऑक्सिजन बेड कमी पडत होते. 67 टक्के ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्याप्त होते. आता 20 टक्क्यांवर हे प्रमाण आल्याने मृत्यूदरही घटला आहे. जिल्ह्यात दररोज 4 ते 5 हजार कोरोना चाचण्या करण्याच्या आरोग्य विभागाकडून सूचना असल्याने चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. यामुळे कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होत आहेत. त्यामुळे अजून आठवडाभरात रुग्णसंख्या कमी होईल, असा विश्वास जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी व्यक्त केला आहे.
शेती कामांमुळे काही ग्रामस्थांनी चाचण्यांसाठी विरोध केला होता, मात्र पोलिसांच्या सहकार्याने त्यांची समजूत काढण्यात आली, मग चाचण्या केल्या गेल्या. अद्यापही थोडे सहकार्य ग्रामीण भागातून मिळणे आवश्यक आहे. तर आपण पॉझिटीव्ह रेटमध्ये 5 टक्क्यांपेक्षा खाली येऊ, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले. तसेच इतर जिल्ह्यात कामानिमित्त गेलेल्या पण त्या ठिकाणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या आधारकार्डवर रत्नागिरीचा पत्ता असल्याने ऑनलाईन पोर्टलवर रत्नागिरीच्या रुग्णसंख्येत भर पडते. सध्या कोरोना बऱ्यांपैकी जिल्ह्यात आटोक्यात आला आहे. डेल्टा व्हेरियंटचा आता एकही नवा रुग्ण नाही. 117 स्वॅबच्या चाचण्यांसाठी गेले आहेत, त्याचेही रिपोर्ट लवकरच प्राप्त होतील, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या 2 महिन्यात जिल्ह्यात परिस्थिती बिकट झाली होती, मात्र लॉकडाऊन नियमावलीचे लोकांकडून पालन झाले. होम आयसोलेशनमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक होते. येथे गावपातळीवर नियोजन कमी पडले. होम आयसोलेशनमध्ये राहिल्यावर रुग्ण नियम पाळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सध्या होम आयसोलेशनमध्ये शक्यतो ठेवले जात नाही. जे स्वतंत्र राहू शकतात, अशांनाच परवानगी दिली जाते, असेही डॉ. फुले यांनी सांगितले. सध्या महिला रुग्णालयात 300 पैकी 90 बेड रुग्णांनी व्याप्त आहेत तर जिल्हा रुग्णालयात 266 पैकी 148 बेड रुग्णांनी व्याप्त असल्याचेही त्यांनी सांगितले.









