कित्येक वर्षे करतेय विनामोबदला काम, जिल्ह्यात साप पकडणाऱ्या महिला खूपच कमी
मनोज पवार / दापोली
सापांना पाहून जिथे भल्याभल्यांची गाळण उडते, अशा सर्पमैत्रीच्या क्षेत्रांमध्ये दापोली शहरातील शिवाजीनगर येथील शिवानी खानविलकर लिलया साप पकडते. पकडलेल्या सापांना त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडते. गेली कित्येक वर्षे ती हे काम विनामोबदला करत असून ती जिल्ह्यातली सर्वात तरुण सर्पमैत्रीण मानली जात आहे. साप पकडणाऱया खूपच कमी महिला जिह्यात आहेत.
दापोली तालुक्यातील सुप्रसिद्ध सर्पमित्र व प्राणीमित्र सुरेश व संजना खानविलकर यांची शिवानी ही कन्या आहे. शिवानी लहानपणापासून आपल्या वडिलांना साप पकडताना व हाताळताना पहात आली आहे. ती आपल्या वडिलांबरोबर नेहमी स्नेक कॉल अटेंड करायला जात असे. पूर्वी आपल्याला देखील सापांची खूप किळस व भीती वाटत असे, असे शिवानी प्रांजळपणे कबूल करते. मात्र आता कोणत्याही सापाची आपल्याला भीती उरलेली नाही, असेही ती ठामपणे सांगते. शिवानीने भले मोठे अजगरदेखील एकटीने पकडले आहेत.
दापोली परिसरात कुणाच्याही घरात साप आला तरी सुरेश खानविलकर यांना फोन येतो. ते दापोलीच्या बाहेर गेले असतील तर शिवानी स्वतः एकटी जाऊन स्नेक कॉल अटेंड करते व त्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सुस्थितीत नेऊन सोडते. यावेळी तिची मोठी बहीण सोनिका तिच्यासोबत असते. सोनिका मात्र साप पकडत नाही. ती केवळ शिवानीची सोबत करते.
सर्प पकडण्याचे विनामूल्य प्रशिक्षण देऊ
शिवानी आज 21 वर्षांची असून तिने बीएस्सी पदवी पूर्ण केली आहे. सध्या ती ऍनिमेशनचे प्रशिक्षण घेत आहे. तिला ऍनिमेशन फिल्ममध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. जिह्यातील प्रत्येक गावात सर्पमैत्रिणींचा ग्रुप असावा, असे शिवानीला वाटते. साप माणसाचे मित्र असतात, हे तिला सर्वांना पटवून द्यायचे आहे. यासाठी जिह्यातील तरुणींनी पुढे यावे, त्या सर्वांना सर्प पकडण्याचे, हाताळण्याचे व नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे विनामूल्य प्रशिक्षण देऊ, असे शिवानीने ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. तिच्या या जगावेगळÎा धाडसाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.