वाळू व्यावसायिकाचीच प्रांताधिकाऱयांकडे तकार, तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / चिपळूण
हातपाटी वाळू परवाना न घेता बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. याची तकार वाळू व्यावसायिक कबीर कटमाले यांनी प्रांताधिकाऱयांकडे केली आहे. त्यामुळे प्रांताधिकारी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र याकडे तहसील कार्यालय दुर्लक्ष करत आहे.
कटमाले यांनी दिलेल्या तकार अर्जात म्हटले आहे की, मिरजोळी, कालुस्ते गोवळकोट, केतकी, करंबवणे, मालदोली, चिवेली, परचुरी, दोणवली-गांग्रई सुतवी बंदर या सर्व भागात पूर्वीप्रमाणे बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक जोरात चालू झाली आहे. दिवसा व रात्रीच्या वेळेस सर्वात जास्त प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक दोणवली बंदर, गांग्रई बंदर, मालदोली, केतकी, करंबवणे येथून होते. ही सर्व गावे मिळून रोज 150 ते 200 ब्रास बेकायदेशीर वाळू बिंनधास्तपणे काढून विकत आहेत. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही.
हातपाटीद्वारे वाळू परवाना घेणाऱयांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून या सर्व बेकायदेशीर वाळू व्यावसायिकांनी आपापल्या परप्रांतीय मजुरांना बोलावून हे बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक सुरू केली आहे. ही वाळू वाहतूक चिपळूण व गुहागर तालुक्यात होत आहे. रात्री 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत भरतीच्या वेळेनुसार वाळू उपसा करण्यात येतो. त्यामुळे याचवेळेला जर पथके तैनात करण्यात आली तर बोटीने बेकायदेशीर वाळू उपसा बंद होणे शक्य आहे. याविरोधात अनेकदा तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. तरी आपण संबंधितांवर दंडात्मक कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कटमाले यांनी केली आहे.









