-‘कोरोनानंतरचे जग’ विशेषांकाचे प्रकाशन, जाहीर कार्यक्रमांचे आयोजन नाही
प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘तरुण भारत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन यावर्षी 5 डिसेंबर रोजी कोविडच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. मात्र कोविडशी दोन हात करताना मार्गदर्शक ठरेल, अशा ‘कोरोनानंतरचे जग’ या 52 पानी विशेष पुरवणीचे प्रकाशन या निमित्ताने होणार आहे. तसेच ‘लढा कोविडशी’ या विषयावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले व शेकडो कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार करणारे डॉ. अनिरुध्द फडके यांची मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रगट मुलाखत होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त नेहमी होणारे जाहीर कार्यक्रम यावर्षी आयोजित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘तरुण भारत’ने रत्नागिरी जिह्यातील चोखंदळ वाचक व जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. 25 वर्षाच्या वाटचालीत हे वर्तमानपत्र प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. दैनिकाबरोबरच विविध वाचनीय पुरवण्या, विशेषांक, लोकोपयोगी उपक्रमांचा पायंडाही ‘तरुण भारत’नेच जिल्ह्य़ात रुजवला. सामान्यांचा आधार आणि नाठाळांचा कर्दनकाळ ठरलेल्या या वृत्तपत्राने अन्याविरुध्द सातत्याने आवाज उठविला आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून दरवर्षी वैविध्यपूर्ण प्रदर्शने, विशेषांक, जाहीर प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रम, स्नेहमेळावा असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात ‘तरुण भारत’ नेहमीच अग्रदूत राहिला आहे. मात्र यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा भाग म्हणून रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन असूनही तो अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
5 डिसेंबर रोजी वर्धापनदिनाचे औचित्य साधून ‘कोरोनानंतरचे जग’ हा 52 पानी विशेषांक प्रकाशित करण्यात येणार आहे. अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन वाचकांना घरबसल्या उपलब्ध करून देण्याचा वारसा ‘तरुण भारत’ने कोविड काळातही जपला आहे. हा वेशेषांक दैनिकाबरोबर वाचकांना मोफत उपलब्ध होणार आहे. कोरोनाशी लढताना बळ यावे, या दृष्टीने या युध्दात पहिल्या दिवसापासून अग्रभागी असणाऱया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले व गंभीर कोविड रुग्णांसाठी विशेष योगदान देणारे डॉ अनिरुध्द फडके यांच्याशी थेट संवाद साधला जाणार आहे. निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱया या कार्यक्रमाचे चित्रिकरण वाचकांसाठी समाजमाध्यमे व वृत्तांकन दैनिकाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य कोणत्याही जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही.
‘तरुण भारत’च्या असंख्य वाचक, जाहिरातदार, वितरक व हितचिंतकांनी आजवर जपलेला स्नेह आजही जपावा, असे आवाहन ‘तरुण भारत’चे समुहप्रमुख व सल्ल्लगार किरण ठाकुर, कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर, संपादक जयवंत मंत्री यांनी केले आहे.









