वार्ताहर / मौजेदापोली
दापोली तालुक्यातील अडखळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. पोलीसांनी करणाऱ्यांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून यातील आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश शिर्के वय ५४ हे अडखळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत. ते २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास म्हैसोंडेवाडी येथे नळपाणी योजनेचे पाणी सोडण्यासाठी गेले असता तेथे रवींद्र बागकर हे डोळे आल्यामुळे चष्मा घालून उभे होते. त्यामुळे प्रकाश शिर्के यांनी त्यांना लांब उभे रहा असे सांगितले. त्याचा राग मनात धरून रवींद्र बागकर वय ४२, अज्ञान बागकर वय ३०, संतोष चव्हाण वय ५०, संकेत चव्हाण वय २३, समीर चव्हाण वय २० सर्व राहणार अडखळ झुंजारवाडी यांनी प्रकाश शिर्के यांना मारहाण केली.
यावेळी प्रकाश शिर्के यांची पत्नी तेथे आली व माझ्या नवऱ्याला का मारता अशी विचारणा केली असता तिलाही धक्काबुक्की केली. याप्रकरणी प्रकाश शिर्के यांनी संशयितांविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन कांबळे करत आहेत.









