भारतीय संघात पुनरागमन करण्यावर भर देणार, बडोदा संघाचे नेतृत्व केदार देवधरकडे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वनडे आणि टी-20 क्रिकेट प्रकारामध्ये भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सरावावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असल्याने अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया रणजी क्रिकेट स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेसाठी बडोदा संघाची घोषणा करण्यात आली असून हार्दिकचा भाऊ कृणाल पंडय़ाचा संघात समावेश करण्यात आला आहे.
बडोदा क्रिकेट संघटनेतर्फे सोमवारी 2022 रणजी क्रिकेट हंगामासाठी 20 सदस्यांचा संघ घोषित करण्यात आला असून केदार देवधरकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. विष्णु सोळंकी या संघाचा उपकर्णधार राहील. बडोदा रणजी संघामध्ये हार्दिकचा समावेश करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले.
28 वर्षीय हार्दिक पंडय़ा मध्यंतरी पाठीच्या दुखापतीमुळे बराच कालावधी क्रिकेटपासून अलिप्त राहिला होता. हार्दिकने आपला शेवटचा सामना गेल्यावर्षी झालेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळला.
हार्दिक पंडय़ा यानंतर आगामी आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पुनरागमन करण्याची शक्यता आहे. 2022 रणजी स्पर्धेत अष्टपैलू हार्दिक पंडय़ा सहभागी होईल, अशी आशा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुलीने गेल्या आठवडय़ात वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती. पाठ दुखापतीमुळे हार्दिकला पूर्ण विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला होता.
गेल्या वर्षी कोरोना महामारी समस्येमुळे रणजी स्पर्धा रद्द करण्यात आली होती. मात्र यंदाच्या रणजी स्पर्धेला 10 फेब्रुवारीपासून प्रारंभ होईल. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, ही स्पर्धा 13 जानेवारीपासून खेळविली जाणार होती. पण, देशात कोरोनाच्या तिसऱया लाटेचा प्रसार सुरू झाल्याने सदर स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली. देशातील प्रीमियर राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान ब्रेक दिला जाणार असून त्यानंतर सदर स्पर्धा 30 मे ते 26 जूनपर्यंत घेतली जाईल.
बडोदा रणजी संघ- केदार देवधर (कर्णधार), विष्णु सोळंकी (उपकर्णधार), प्रत्युष कुमार, शिवलिक शर्मा, कृणाल पंडय़ा, अभिमन्यू सिंग रजपूत, ध्रृव पटेल, मितेश पटेल, एल. मेरिवाला, बाबासाहिफखान पठाण, अतित शेख, भार्गव भट्ट, पार्थ कोहली, शाश्वत रावत, सोएब सोपरिया, कार्तिक काकडे, गुरजिंदरसिंग मान, जोत्स्निल सिंग, निनाद रतवा आणि अक्षय मोरे.









