आता उच्च दर्जाच्या छायाचित्रांसह पृथ्वीचे निरीक्षण शक्य ः ‘पीएसएलव्ही’चे 54 वे उड्डाण यशस्वी
श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी पीएसएलव्ही-सी-52 द्वारे पृथ्वीचे निरीक्षण करणारा ईओएस-04 उपग्रह प्रक्षेपित केला. यासोबतच आणखी दोन छोटे उपग्रहही अवकाशात पाठवण्यात आले आहेत. ‘पीएसएलव्ही’चे हे 54 वे यशस्वी उड्डाण आहे. या मोहिमेच्या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे.
2022 मधील इस्रोची ही पहिलीच मोहीम यशस्वी ठरल्याने शास्त्रज्ञांचा उत्साह वाढला आहे. ईओएस-04 ला सकाळी 5.59 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. या उपग्रहाचे वजन 1,710 किलो असून तो रडार इमेजिंग उपग्रह आहे. पृथ्वीची उच्च दर्जाची छायाचित्रे घेण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे. हा उपग्रह मुख्यत्वेकरून शेतीचे उच्च रिझोल्यूशनचे फोटो, जमिनीतील ओलावा, पाण्याची उपलब्धता आणि पूरप्रवण क्षेत्रांचे नकाशे अशा विविध स्थिती कॅप्चर करण्यासाठी डिझाईन केला आहे.
आणखी दोन उपग्रहही रवाना
ईओएस-04 सोबत आणखी दोन उपग्रहही अवकाशात पाठवण्यात आले आहेत. यामध्ये ‘इन्स्पायर सॅट-1’ आणि ‘आयएनएस-2टीडी’ यांचा समावेश आहे. ‘इन्स्पायर सॅट-1’ उपग्रह इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बनवला आहे. याच्या निर्मितीसाठी अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठाच्या ऍटमॉस्फियर अँड स्पेस फिजिक्सच्या प्रयोगशाळेची मदत घेण्यात आली आहे. तर दुसऱया उपग्रहाचे नाव आयएनएस-2टीडी असे असून तो भारत-भूतानचा संयुक्त सॅटेलाईट आहे. हा एक बोल्डर आणि तांत्रिक प्रात्यक्षिक उपग्रह आहे. याद्वारे जमिनीचे तापमान, सरोवरांमधील पाण्याचे, पृ÷भागाचे तापमान, आर्द्रता आदी बाबी तपासल्या जातील.









