नंदनवन हे इंद्राणीचे भोगवन असल्याने तुम्हाला तिथे प्रवेश करता येणार नाही असे इंद्राच्या सेवकांनी कृष्ण व सत्यभामेला सांगितले. त्यावर सत्यभामा म्हणाली – मी देवांचाही देव असलेल्या श्रीकृष्णाची भार्या आहे. माझ्यापुढे इंद्र पत्नीला कोणता मान, असे म्हणत ते दोघेही नंदनवनात शिरले. त्यांनी पारिजातकाचा वृक्षच उपटला व ते गरुडावर बसून आकाशमार्गे जाऊ लागले. तेव्हा इंद्राच्या सेवकांनी एकच गदारोळ केला. इंद्र सावध झाला. सर्व देवतांचे सैन्य घेऊन तो कृष्णाला अडवायला धावला. तेव्हा सत्यभामेने काही देवांना पराजित केले तर गरुडाने काहींना पराजित केले. मग कृष्णाने इतर देवांना, यक्षांना व गंधर्वांना पराजित केले. इंद्र वज्र घेऊन कृष्णावर वार करायला धावला. तेव्हा कृष्णाने सुदर्शन चक्राला त्याचा बंदोबस्त करायची आज्ञा दिली. ते पाहताच देवगुरु बृहस्पती घाबरले व ते कृष्णाला शरण आले. कृष्णाला वंदन करून ते म्हणाले-
म्हणे जय जय जगदीश्वरा । आम्हां कृतघ्नां पामरां। कृपेनें देऊनि अभयकरा। रक्षिसी अमरां निज दासां ।अमरेंद्रत्वाचा अभिमान। यास्तव गोकुळीं केलें विघ्न। तैं त्वा धरूनि गोवर्धन । गर्व भंगूनि लाजविलें।त्रिदशमंडळीं पावलों तपा। तैं त्वां पुढती करूनि कृपा। रक्षिलें असतां सुरपादपा। निमित्त आतां विरोधिलें। सर्वापराध करूनि क्षमा । कृपावत्सला पुरुषोत्तमा। दासांमाजी कृतघ्नां अधमां। रक्षिजे आम्हां मातृवत् ।मातृगर्भींचे क्लेश नाना । विशेष प्रसूतिसमयीं जाणा । बाल्यावयवसंरक्षणा । पुत्र कृतघ्नासम विसरे ।तथापि करुणावत्सल माता। सहसा न करी पुत्रघाता । तेंवि आम्हां स्वजठरस्थां । विभो समर्था रक्षावें ।
बृहस्पती म्हणाले-हे देवाधिदेवा! आमचे अनंत अपराध पोटात घाल. आपण देवांचा राजा आहोत असा अभिमान बाळगून इंद्राने पूर्वी गोकुळात प्रचंड पाऊस पाडला, त्यावेळी आपण गोवर्धन पर्वत उचलून सर्व गोकुळवासी जनांचे रक्षण केले व अमरेंद्राचा अभिमान नष्ट केला. परंतु आम्ही देव वारंवार तीच चूक करतो. आई आपल्या पोटातील बाळाचे सगळे क्लेश, अपराध सहन करते. बालक कितीही कृतघ्नपणे वागले तरी आई त्याच्यावरील वात्सल्य कमी करीत नाही. तरी देवा आपण आम्हाला मातेप्रमाणे क्षमा करावी. बृहस्पतींच्या विनंतीला मान देऊन कृष्णाने इंद्राला माफी दिली. मग तो पारिजात घेऊन कृष्ण व सत्यभामा द्वारकेत आले.
सत्यभामेच्या गृहोद्यानीं । कल्पतरु लाविला यत्नीं । ज्याच्या सौरभ्या वेधूनी। आले स्वर्गौनि सुरभ्रमर ।निष्कुट म्हणजे गृहोद्यान । पार्यातकुसुमीं सौरभ्यपूर्ण । तेणें अत्यंत शोभायमान । भामाभुवन दिविसाम्यें ।
भगवंतांनी तो पारिजातक सत्यभामेच्या महालाच्या बागेत लावला. त्यामुळे बागेची शोभा अतिशय वाढली. त्या वृक्षाबरोबरच त्याचा सुगंध आणि मध यांचे लोभी भ्रमर स्वर्गातून द्वारकेत आले होते.
ही कथा ऐकून परिक्षिती राजाला मात्र देवांच्या वर्तनाचे आश्चर्य वाटले.
इंद्रें सहित निर्जरपंक्ति। जिणोनि पार्यात आणिला क्षिती । हें ऐकोनि परीक्षिति । उदित चित्तीं प्रश्नार्थ ।
Ad. देवदत्त परुळेकर








