प्रतिनिधी/ रत्नागिरी
जीवनात ‘रक्तदान’ हे श्रेष्ठदान मानले जाते. पण या रक्तदानाबरोबर ‘अवयवदान’ ही बाब देखील तितकीच महत्वाची आहे. प्रत्येकांने अवयवदानाचे मौलिक कार्य करून गरजूंच्या आयुष्यात नवा प्रकाश पाडावा, असे प्रतिपादन रक्तदात्या वैशाली अभिजित खाडिलकर यांनी व्यक्त केला.
‘तरूण भारतच्या 26 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘तरूण भारत सन्मान’ वितरण सोहळय़ाप्रसंगी त्या बोलत होत्या. या सोहळय़ात वैशाली खाडिलकर व अभिजित खाडिलकर या दाम्पत्याचा 60 वेळा रक्तदानाचे कार्य केल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला. कोरोनाचा काळ हा साऱयांनाच कठीण काळ गेला. अनेकांना कोरोनाची लागण झालेली असतानाच अशा अनेक रुग्णांसाठी रक्तदानाच्या माध्यमातून ’जीवनदायी’ बनले. त्यांनी आजपर्यंत तब्बल 60 वेळा रक्तदानाचे सर्वश्रेष्ठ कार्य केले आहे.
संकेत चाळकेंचाही ‘तरूण भारत सन्माना’ने गौरव
दिव्यांग व शासन यांच्यातील महत्वपूर्ण दुवा ठरलेल्या रत्नागिरीतील कुवारबाव परिसरात राहणाऱया संकेत संजय चाळके यांचाही यावेळी ‘तरूण भारत सन्मान’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. दिव्यांगांना मार्गदर्शन, त्यांचे पुनर्वसन व त्यांनाही अव्यंगाच्या बरोबरीने जीवनाचा आनंद सक्षम करण्याचे शिवधनुष्य चाळके यांनी पेलले आह. या कार्यात ‘आस्था’ संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेत त्याला चळवळीचे स्वरूप व अनेक कुटुंबात प्रकाश पसरवण्यात चाळके हे यशस्वी ठरले आहेत. संकेत यांना हा सन्मान पुरस्कार वितरण करतेवेळी त्यांचे कुटुंबिय, आस्था फाउंडेशन या संस्थेच्या सुरेखा पाथरे व सदस्य हे देखील उपस्थित होते.
गौरवमूतीं गेले भारावून
‘तरूण भारत’च्यावतीने घेण्यात आलेली कार्याची दखल व केलेल्या या सन्मानाने खाडिलकर व चाळके हे गौरवमूतीं पुरते भारावून गेले. त्यांनी ‘तरूण भारत’ परिवाराप्रती आपली यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. या सन्मानार्थींचे कार्य ऐकून उपस्थितांनीही कौतुक केले.









