शिमगोत्सवासाठी चिपळूणला घरी आले व त्यानंतर एकवीस दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला. खरं तर या परिस्थितीत बरं यासाठी वाटत होतं की सुदैवाने मी माझ्या कुटुंबासोबत घरी असणार होते. पण वाईटही वाटत होतं, कारण इतके दिवस रंगभूमीपासून वंचित रहावे लागणार होतं. पण या काळात लॉकडाऊन करणे अत्यंत गरजेचे आहे, हेही मला पटलं आणि मी लॉकडाऊनचा काळ माझ्या कुटुंबासोबत आनंदात घालवण्याचे ठरवलं. कुटुंबासोबत लॉकडाऊनमधील दिवस खूप एन्जॉय करत आहे. मोरूची मावशी आणि पुन्हा सही रे सही या नाटकांचे महाराष्ट्रभर दौरे असायचे, त्यामुळे सतत घराबाहेर राहावे लागायचे पण लॉकडाऊनच्या निमित्ताने कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवायची संधी मिळाली आहे, त्याचा आनंद मला खूप अधिक आहे.
सध्या सर्व जगात कोरोना या भयानक महामारीचं संकट घोंगावत आहे. परिस्थिती गंभीर आहे पण ती आटोक्यात आणणं हे फक्त आपल्या हातात आहे. हे युद्ध बाहेर पडून नाही तर घरात राहूनच सर्वांना जिंकायचा आहे. आपल्या सर्वांनाच सीमेवरील जवानांना जवानांचा खूप अभिमान असतो, कारण ते सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करत असतात. ती भावना घरात राहून अनुभवण्याची संधी आपल्याला लॉकडाऊनमुळे मिळाली आहे. आपणही आपल्या देशाचे रक्षण आणि सेवा करू शकतो तेही घरी राहून. मी हे सध्या हाच अनुभव घेत आहे.
या नैसर्गिक आपत्तीचे दुःख मला आहेच, शिवाय सततच्या कोरोनाच्या बातम्यांमुळे मनावर थोडा ताणही निर्माण होतो पण कुटुंबासोबत सहभोजन, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, कॅरम, पत्ते यांसारखे खेळ खेळणे, यामुळे मनावरील ताण कमी व्हायला चांगली मदत होत आहे. कुटुंबातील सदस्यांशी मनमोकळ्या गप्पा-टप्पा, तसेच घराची स्वच्छता सर्वांनी एकत्र मिळून करणे, हाही अनुभव या काळात अनुभवायला मिळाला व त्यातून आनंद मिळाला. मला पाककलेची आवड आहे. त्यामुळे पाककलेतील वेगवेगळे प्रयोग करून पाहणे आणि पदार्थ करून खाणे आणि घरातील सर्वांना खायला घालने, यातील मजाही काही औरच असते नियमित व्यायाम, योगासने यामुळे प्रसन्न तर वाटत आहेच पण या लढाईच्या काळात नृत्याचा सराव करतानाही खूप आनंद वाटतोय आणि वेळही खूप छान जातो. वाचन, चित्रपट, वेबसीरीज बघणं आणि दिग्गज कलावंतांच्या मुलाखती पाण्यासाठीही मी या वेळेचा सदुपयोग करून घेत आहे. त्यामुळे कला क्षेत्रातील नवनवीन माहिती मिळून ज्ञानात चांगलीच भर पडत आहे आणि अभ्यासही होत आहे. आई-बाबांकडून ऐकले होते की त्यांच्या लहानपणी रामायण व महाभारत पाहण्यासाठी सर्वजण एकत्र येत असत. तो सुवर्णकाळ आज अनुभवायला या लॉकडाऊमुळे मिळत आहे. कुटुंबाने एकत्र येऊन या मालिका पाहणे यासारखे दुसरं कुठलं सुख नाही. त्यामुळे इतिहास आणि धर्माबद्दल अमूल्य माहिती मला मिळत आहे. ज्ञानात भर पडत आहे. तसेच नियमित नामस्मरण, ध्यान, रामरक्षा स्तोत्र पठण, यामुळे मनःशांती मिळायला मदत होत आहे. लॉकडाऊनमुळे पर्यावरणात कमालीची सुधारणा होत आहे. आपण सर्वांनी आपल्या निसर्गाला जपणं फार गरजेचे आहे. लॉकडाऊनने आपल्या सगळ्यांनाच चांगली शिकवण दिली आहे की निसर्गाची काळजी आपण घेतली तर निसर्गही आपली काळजी आपोआपच घेतो. नाहीतर आपणच आपल्या विनाशासाठी कारणीभूत ठरू शकतो. ठरवूनही धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून कुटुंबासमवेत असा इतका एकत्र वेळ घालवणं तितकच शक्य होऊ शकलं नव्हतं परंतु लॉकडाऊनमुळे हा सुवर्णकाळ अनुभवता आला. मात्र असा सुवर्णकाळ अनुभवण्यासाठी अशा भयानक परिस्थितीचा पुन्हा कधीच आधार घ्यायची वेळ येऊ नये, असे मात्र मनापासून वाटते. कोरोनाच्या महामारीच्या भीषण संकटातून सर्व जगाची लवकरात लवकर सुटका व्हावी आणि मलाही रंगभूमीची सेवा करण्याची संधी मिळावी, हीच प्रार्थना करते.









