प्रतिनिधी / कोल्हापूर
रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी मंजूर झालेल्या निधीतून केवळ सुशोभिकरणाची कामे न करताना शहाजी कॉलनी, हिंद तरुण मंडळ, टिंबर मार्केट या भागातून तलावात मिसळणारे मैला मिश्रित सांडपाणी रोखण्याचे काम करावे, मंजूर निधीमध्ये हे काम धरण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिले आहे.
इंगवले यांनी निवेदनात म्हटले आहे, कोल्हापूर शहराच्या अस्मिता असणाऱ्या रंकाळा तलावात गेल्या चार पाच वर्षांमध्ये शहाजी कॉलनी, हिंद तरुण मंडळ, टिंबर मार्केट परिसरातील पावसामुळे निर्माण होणारे सांडपाणी नाले पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यामध्ये मैलामिश्रित पाणी साचून ते सरनाईक कॉलनी (दत्त तरुण मंडळ) येथून रंकाळÎात मिसळते. या सांडपाण्यामुळे रंकाळा तलाव प्रदूषित होत असून पुन्हा जलपर्णी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे रंकाळा तलावाचे सुशोभिकरण करण्यासाठी खर्च करत आलो आहोत.
पण याआधी अशाच दुर्गंधयुक्त सांडपाण्याने रंकाळा तलाव प्रदूषित झाला होता. जलपर्णी वाढल्या होत्या. त्याचा नाहक त्रास सरनाईक कॉलनी पासून संध्यामठ, रंकाळा टॉवरपर्यंतच्या नागरिकांना झाला होता. आजही असाच त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेकडून एकप्रकारे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले जात आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी मंजूर झालेल्या निधीतून सांडपाणी मिसळू नये, यासाठी उपाययोजना करणारे काम पूर्ण करावे. डीपीआरमध्ये या कामाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणीही इंगवले यांनी या निवेदनात केली आहे.









