ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला भाजपचे मोठे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे. पण या शपथविधी सोहळ्याच्या काही तास आधीच राजधानी लखनऊत पोलिसांनी चकमकीत एका गुंडाला ठार केलं आहे. हसनगंज परिसरात झालेल्या चकमकीत पोलिसांनी राहुल सिंह नावाच्या गुंडाला ठार केलं. राहुल सिंहवर अलिगंजमधील ज्वेलर्सला लुटल्याचा आऱोप होता. या चोरीदरम्यान त्याने एकाची हत्या केली होती.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल सिंहवर एक लाखाचं बक्षिस होतं. शुक्रवारी पहाटे ४ वाजता लखनऊ पोलिसांनी हसनगंज परिसरात राहुल सिंहला घेरलं. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु झाला. या गोळीबारात राहुल सिंह जखमी झाला होता. त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
राहुल सिंहकडे लुटलेले सोन्याचे दागिने सापडले असून, पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.