शायर मुनव्वर राणा यांची घोषणा
देशातील दिग्गज शायरांपैकी एक मुनव्वर राणा यांनी निवडणुकीपूर्वी मोठे वक्तव्य केले आहे. योगी आदित्यनाथ पुन्हा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यास राज्य सोडणार आहे. स्वतःची भूमी सोडण्याचे दुःख तर होणारच, परंतु जेव्हा घरटं धोक्यात येते, तेव्हा पक्षी देखील ते सोडत असल्याचे राणा यांनी म्हटले आहे.
सत्तेत असलेले लोक आता देवदूत म्हणून बाहेर पडले आहेत. जातपातीच्या नावावर किती अत्याचार केले हे त्यांना आठवत नाही. कोरोना संकटात किती जण मृत्युमुखी पडले, पायी चालून किती जणांचा जीव गेला या सर्व गोष्टींचा या निवडणुकीत हिशेब होणार असल्याचे राणा यांनी म्हटले आहे.
योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास उत्तरप्रदेश सोडणार आणि दिल्ली-कोलकाता येथे स्थायिक होईन. माझ्या वडिलांनी पाकिस्तानात जाणे टाळले, परंतु आता मोठय़ा दुःखासह मला हे शहर, हे राज्य आणि स्वतःची भूमी सोडावी लागणार असल्याचे विधान त्यांनी केले.
आणीबाणीपेक्षा योगी सरकारचा कार्यकाळ वाईट होता, आणीबाणीत सर्व त्रस्त होते, परंतु या साडेचार वर्षांमध्ये योगी सरकारकडून केवळ मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आले. योगी आदित्यनाथ यांच्या मनात मुस्लिमांबद्दल पूर्वीपासून द्वेष होता, त्यांनी केलेले विधाने एखाद्या गुंडाला शोभणारी होती असा आरोप राणा यांनी केला आहे.
दिल्ली, कोलकाता, गुजरात सुरक्षित
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर हात ठेवून चुकीचे केले, यामुळे योगींनी उत्तरप्रदेशात भेदभाव फैलाविला. या सरकारने सबका साथ, सबका विकास हा केवळ नारा दिला. माझ्यासाठी दिल्ली, कोलकाता, गुजरात अधिक सुरक्षित असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.









