जनतेने आता तरी काळजी घेणे गरजेचे, अन्यथा धोका वाढण्याची शक्यता
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येळ्ळूरमध्ये कोरोना बाधित दुसरा रुग्ण आढला आहे. त्यामुळे काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी एका महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर ती महिला कोरोनामुक्त झाली. त्यामुळे गावातील भिती दूर झाली होती. मात्र आता पुन्हा आणखीन एक रुग्ण आढळल्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. आता जनतेने दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोनाबाबत ग्राम पंचायत जनजागृती करुनही त्याकडे अनेक जण दुर्लक्ष करत आहेत. मास्क न वापरता फिरणे, सुरक्षित अंतराचा अभाव, सॅनिटायझरचा वापर न करणे अशा घटना निदर्शनास येत आहेत. तेंव्हा प्रत्येकाने आता तरी काळजी घ्यावी अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
येळ्ळूरमधीलएका महिलेला लागण झाल्यानंतर संपूर्ण गाव सीलबंद करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या घरापासून 50 मीटरपर्यंतचे अंतर सीलबंद करण्यात येणार आहे. मात्र सर्वांनीच अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. मला काही होणार नाही, अशा भ्रमात कोणीही राहू नये. हा आजार संसर्गजन्य आहे. तेंव्हा काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजेत.
कोरोनामुळे गावातील डॉक्टरही सेवा देण्यास घाबरत आहेत. कारण जनता सतर्क राहत नाही. त्यामुळे त्यांना उपचार करणेही कठीण जात आहे. विनाकारण बाहेर फिरणे, एकत्रित घोळका करुन उभे राहणे, काही जणांनी सुचना केली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे, त्याला काय समजते असे ठोमणे मारुन नियमांचे उल्लंघन करणे हे कोठे तरी थांबले पाहिजे. अन्यथा याचा फटका सर्वांनाच बसण्याची शक्मयता नाकारता येत नाही.
गुरुवारी संबंधित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने त्या गल्लीमध्ये जाऊन बांबूच्या सहाय्याने गल्ली सीलडाऊन करण्यात आली. मात्र त्यानंतर पुन्हा अधिकाऱयांच्या सुचनेमुळे ते बांबू काढण्यात आले. त्यामुळे अहवाल निगेटिव्ह झाला म्हणून संभ्रमावस्था निर्माण झाली. तेंक्हा प्रत्येकाने अशा अफवा न पसरविता काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.









