ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेश विधानसभेसमोर आज दुपारी एका महिलेने स्वतःला पेटवून घेतले. या घटनेने एकच गोंधळ उडाला. जवळच असणाऱ्या पोलिसाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. त्यानंतर महिलेला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा विवाह महाराजगंज येथे राहणाऱ्या अखिलेश तिवारी यांच्याशी झाला होता. मतभेदानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर महिलेने आपला धर्म बदलून आसिफ नावाच्या एका मुस्लिम तरुणाशी लग्न केले. लग्नानंतर आसिफ सौदी अरेबियाला गेला. दरम्यानच्या काळात आसिफचे नातेवाईक तिचा छळ करू लागले. याची तक्रारही मेहराजगंज पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही.
न्यायासाठी या महिलेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घ्यायची होती. मात्र, योगींची भेट न झाल्याने निराश झालेल्या त्या महिलेने स्वतःला पेटवून घेतले. ही महिला गंभीर स्वरूपात भाजली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.









