वृत्तसंस्था/ सेंट जोन्स (अँटीग्वा)
येथे सुरू असलेल्या आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाक क्रिकेट संघाने पाचव्या स्थानाच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळविले. या स्पर्धेतील सोमवारी झालेल्या पाचव्या स्थानासाठी झालेल्या प्लेऑफ सामन्यात पाकने बांगलादेशचा 6 गडय़ांनी पराभव केला.
या सामन्यात पाक संघातर्फे हसीबूल खानने शानदार अर्धशतक झळकविले. बांगलादेशचा डाव 49.2 षटकांत 175 धावांत आटोपला. बांगलादेशच्या डावामध्ये अरीफूल इस्लामने शानदार शतक 118 चेंडूत झळकविले. तत्पूर्वी बांगलादेशची स्थिती 12 षटकांत 3 बाद 23 अशी केविलवाणी होती. 17 वर्षीय इस्लामने आपले अर्धशतक षटकाराने पूर्ण केले. त्यानंतर त्याने 49 व्या षटकांत आपले शतक पूर्ण केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या असिबूल खानने मोहम्मद शेहजादसमवेत 19 षटकांत 76 धावांची भागिदारी केली. शेहजाद 36 धावांवर बाद झाला. हसिबूल खानने 4 षटकार आणि चार चौकारांसह 78 धावा जमविल्या. तो बाद झाला त्यावेळी पाकला विजयासाठी 36 धावांची जरूरी होती. इरफान खान 24 धावांवर धावचीत झाला. कासीम अक्रम आणि अब्दुल फसेह यांनी 21 चेंडू बाकी ठेवून आपल्या संघाला 6 गडय़ांनी विजय मिळवून दिला. अब्दुल फसेहने नाबाद 22 धावा जमविल्या. आता या स्पर्धेत पाक आणि लंका यांच्यात गुरूवारी पाचव्या स्थानाचा प्लेऑफ सामना खेळविला जाईल तर बांगलादेश व द.आफ्रिका यांच्यात सातव्या स्थानासाठी लढत होईल.









