यू-19 विश्वचषकादरम्यान भारतीय पथकात कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंतेचे वातावरण, पर्यायी खेळाडू तातडीने विंडीजला रवाना होणार
तारौबा (त्रिनिदाद) / वृत्तसंस्था
यू-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी सध्या विंडीज दौऱयावर असलेल्या भारतीय पथकातील कर्णधार यश धुळ, उपकर्णधार शेख रशीदसह 6 खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली असून यामुळे बुधवारी एकच खळबळ उडाली. हे सर्व खेळाडू ब गटातील आयर्लंडविरुद्ध लढतीत खेळू शकले नाहीत.
धुळ व रशीद यांच्याशिवाय आराध्य यादव, वासू वत्स, मानव पारख, सिद्धार्थ यादव यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले. यामुळे, भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध कसाबसा 11 सदस्यांचा संघ मैदानात उतरवू शकला.
‘तिघे भारतीय खेळाडू कालच पॉझिटिव्ह ठरले आणि त्यांना आयसोलेट केले गेले. त्यानंतर आज सकाळी घेण्यात आलेल्या रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये कर्णधार व उपकर्णधाराचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजन टेस्टचा अहवाल अंतिम मानला जात नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व खेळाडूंनी सामन्यातून माघार घेतली. या रॅपिड अँटिजन टेस्टनुसार आमच्या पथकातील 17 पैकी 6 खेळाडू पॉझिटिव्ह आले आणि या सर्वांना आयसोलेट केले गेले. सध्या आमच्याकडे केवळ 11 खेळाडू उपलब्ध आहेत. त्यांनाच उतरवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता’, असे भारतीय पथकातील एका अधिकाऱयाने नमूद केले.
कर्णधार यश धुळ व रशीद यांचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामी लढतीत समावेश होता. मात्र, आराध्यला त्या लढतीत खेळवले गेले नव्हते. बुधवारी धुळच्या गैरहजेरीत निशांत सिंधूने भारतीय युवा संघाचे नेतृत्व सांभाळले. भारतीय युवा संघाने गयाना येथे आपली सलामीची लढत खेळली आणि त्यानंतर आयर्लंडविरुद्ध लढतीसाठी ते त्रिनिदादला रवाना झाले. गयाना येथील वास्तव्यादरम्यान सदर खेळाडूंना बाधा झाली असावी, असा अंदाज आहे.
भारतीय संघ या युवा विश्वचषक स्पर्धेत आता शनिवारी युगांडाविरुद्ध मैदानात उतरणे अपेक्षित आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ही लढत होऊ शकणार का, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. ‘जर सर्व खेळाडूंना आयसोलेशनमध्ये रहावे लागले तर काही राखीव खेळाडूंना मुख्य संघात स्थान मिळू शकेल. रॅपिड अँटिजन टेस्टचे आणखी 3 अहवाल येणे बाकी आहे. त्यांचे आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह येतील, अशी आम्हाला आशा आहे’, असे मंडळातील एका सूत्राने नमूद केले.
भारतीय संघाने सदर स्पर्धेसाठी प्रारंभी 16 सदस्यीय संघ जाहीर केला असून 5 खेळाडू राखीव आहेत. आयसीसीने स्पर्धेसाठी केवळ 17 खेळाडूंना परवानगी दिली असल्याने संघातील राखीव खेळाडू भारतातच आहेत. आता 6 खेळाडू कोरोनाबाधित असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले असल्याने पर्यायी खेळाडू विंडीजला तातडीने रवाना होतील, असे जाहीर केले गेले. कोरोनाची बाधा झाल्यास 10 दिवस सक्तीचे क्वारन्टाईन असेल. त्यामुळे, ही स्पर्धा बाद फेरीत पोहोचेल, त्याचवेळी मुख्य खेळाडू खेळू शकतील. भारताने या स्पर्धेत बाद फेरी गाठली तर त्यांची उपांत्यपूर्व फेरी दि. 29 जानेवारीला खेळवली जाऊ शकते.









