समोरच्याचे मन मोडण्याचा विकार
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कनिकाने आतापर्यंत स्वतःच्या 3 नात्यांमध्ये जोडीदाराचा विश्वासघात केला आहे, कारण आपण काही चुकीचे करत आहोत असे तिला वाटतच नाही. कनिका बत्रा स्वतःला सोशियोपॅथ ठरविते, कारण तिच्या व्यक्तिमत्त्वात काही अशा अजब डिसऑर्डर आहेत, ज्या कुणाचे मन दुखाल्यावरही तिला वाईट वाटू देत नाहीत.
26 वर्षीय कनिकाचा आजार अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा आहे. यात माणसाचा मेंदू कधीच स्थिर राहत नाही आणि त्याला काही तरी करण्याची तीव्र इच्छा होते. त्या व्यक्तीमध्ये एम्पॅथीचा अभाव असतो आणि गुन्हय़ाची जाणीव देखील नसते.
सिडनीमध्ये राहणाऱया कनिकाने एका युटय़ूब व्हिडिओद्वारे आपण 3 नात्यांमध्ये स्वतःच्या जोडीदाराला फसविले असल्याचे सांगितले आहे. समोरच्या व्यक्तीला फसविल्यावर वाईट वाटत नाही. अशा प्रसंगानंतरही मी आरामात घरी जाते आणि निवांत झोपी जात असल्याचे कनिका सांगते.

कुठल्याही नात्यात असताना कमीत कमी नुकसान व्हावे असा प्रयत्न करत असते. मी स्वतःला चांगल्याप्रकारे ओळखते आणि माझा खोटारडेपणा आणि फसवणूक अंगलट येऊ शकते हे देखील मला ठाऊक आहे. मला देखील भावना आहे, पण त्या इतरांप्रमाणे निश्चितच नसल्याचे कनिकाने म्हटले आहे.
कनिकाने स्वतःच्या आजारावर उपचारासाठी अनेक डॉक्टरांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. डॉक्टरांनुसार कनिका आता स्वतःच्या आजाराशी लढणे शिकू लागली आहे. ती आता सर्वसामान्य लोकांपेक्षा अधिक जागरुक राहते आणि स्वतःच्या आर्थिक सुरक्षेविषयीही अधिक विचार करते.









