बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई : आणखी तिघांचा शोध जारी
प्रतिनिधी /बेळगाव
आर्थिक व्यवहारातून रणकुंडये (ता. बेळगाव) येथील एका युवकाचा भीषण खून करण्यात आला होता. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सोमवारी त्याच गावातील तिघांना अटक केली आहे. आणखी तिघेजण फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
प्रमोद सहदेव पाटील (वय 32), त्याचा भाऊ श्रीधर पाटील (वय 28) व महेश कंग्राळकर (वय 21, तिघेही रा. रणकुंडये) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. एकूण सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आणखी तिघा जणांचा शोध सुरू केला आहे.
शनिवारी मध्यरात्री राणकुंडये येथील नागेश भाऊसाहेब पाटील (वय 31) या युवकाचा भीषण खून करण्यात आला होता. टोळक्मयाच्या हल्ल्यात त्याचा भाऊ मोहन (वय 28) हाही जखमी झाला आहे. प्रमोद पाटीलला काही वर्षांपूर्वी दिलेले 20 हजार रुपये परत मागितल्यामुळे नागेशचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून उघडकीस आले आहे. नागेश व त्याचा भाऊ मोहन यांना हल्लेखोरांनी खुनानंतर त्यांच्या घरासमोर टाकून दिले होते. बेळगाव bग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.









