ऑनलाईन टीम / पुणे :
समाजात कोठेही अन्याय होत असेल, तर तो प्रश्न सोडविण्याकरीता आपण प्रयत्न करायला हवे. सर्वजण एकत्र आलो, तर समाजासाठी काहीतरी चांगले करणे शक्य आहे. युवकांमध्ये नैराश्य आणि स्थलांतर या गोष्टी आजमितीस वाढत आहेत. ते टाळण्यासाठी ध्यान, ज्ञान आणि साधनेच्या माध्यमातून युवकांनी अध्यात्माकडे वळायला हवे, असे प्रतिपादन प.पू. श्री श्री रविशंकर यांनी केले.
भारत विकास संगम व महा एनजीओ फेडरेशन यांच्यावतीने राष्ट्रसेवा मंथन २०२१ या विशेष राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्ह्यातील मरकळ येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या त्रिवेणी आश्रमात करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प.पू. श्री श्री रविशंकर यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी भारत विकास संगमचे संस्थापक के.एन. गोविंदाचार्य, राज्यसभेचे माजी खासदार बसवराज पाटील, नवनिर्माण विकास युवक मंडळ लापोडीया राजस्थानचे अध्यक्ष लक्ष्मणसिंग लापोडीया, मुख्य संयोजक व महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा आदी उपस्थित होते.
श्री श्री रविशंकर म्हणाले, जीवनातून निरसता दूर करायची असेल, तर सेवा करणे गरजेचे आहे. याकरीता गैरसरकारी संस्थाने म्हणजेच सामाजिक संस्था एकत्र येणे आवश्यक आहे. माणसामधील चेतना जेव्हा प्रफुल्लीत होईल, तेव्हा चांगल्या कामास सुरुवात होते. सेवेसोबत साधना करणे देखील गरजेचे आहे. कोणतेही काम किंवा सेवा करताना मनोबल असायला हवे. ते मनोबल वाढविण्याकरीता ध्यान व साधनेची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
के.एन. गोविंदाचार्य म्हणाले, जेव्हा समाज पुढे असेल आणि सत्ता मागे, तेव्हा ख-या अर्थाने समाजाचा विकास होईल. देशामध्ये आर्थिक व सामाजिक विषमता वाढत असून त्यामध्ये बदल होणे गरजेचे आहे. प्रकृती विध्वंस व पर्यावरण विध्वंस याचा हा परिणाम आहे. मानव केंद्रीत विकासापेक्षा प्रकृती केंद्रीत विकास व्हायला हवा. मानवासोबतच इतर सर्व जीव व पर्यावरणाचा विकास देखील गरजेचा आहे. त्याकरीता पुढील २० वर्षांसाठी सज्जनशक्तीचे संघटन देशासाठी आवश्यक आहे








