व्यापार करारासाठी 15 ऑक्टोबरपर्यंतची मुदत : अन्यथा विनाअट महासंघ सोडू
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटन आणि युरोपीय महासंघातील व्यापार करार संकटात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या करारासाठी 15 ऑक्टोबरपर्यंतची मुदत निश्चित केली आहे. या मुदतीत करार न झाल्यास ब्रिटन विनाअट युरोपीय महासंघातून वेगळा होणार होणार आहे. युरोपीय महासंघाने पुनर्विचार केला तरच करार होऊ शकतो असे जॉन्सन यांनी म्हटले आहे. तर महासंघाने कराराबद्दल ब्रिटन गांभीर्य दाखवत नसल्याचा आरोप केला आहे.
31 जानेवारी ब्रिटनने युरोपीय महासंघाला सोडचिठ्ठी दिली होती. परंतु व्यापार करार न झाल्याने अद्याप युरोपीय महासंघाच्या काही नियमांचे पालन केले जात आहे. महासंघाचा सदस्य असताना ब्रिटनला युरोपीय देशांशी होणाऱया व्यापारादरम्यान सूट मिळत होती. परंतु बेक्झिट झाल्याने परस्परांमध्ये व्यापार करताना अनेक शुल्क भरावे लागणार आहेत. या कारणामुळे ब्रिटन आणि महासंघ व्यापाराप्रकरणी अन्य देशांच्या तुलनेत सवलती मिळतील अशाप्रकारचा करार करू इच्छित आहेत.
पण या करारासंबंधीची चर्चा अद्याप फलदायी ठरलेली नाही. ब्रिटन आणि महासंघादरम्यान डिसेंबरपर्यंत जुन्या नियमांनुसारच व्यापार होणार आहे. करार न झाल्यास दोघांनाही याचा फटका बसणार आहे, परंतु ब्रिटनवर याचा सर्वाधिक प्रभाव दिसून येईल.
करारातील अडचणी
युरोपीय देशांना ब्रिटनच्या समुदात मासेमारीचा अधिकार मिळावा आणि ब्रिटनच्या सरकारने उद्योगांना सहाय्य करावे अशी महासंघाची भूमिका आहे. तर ब्रिटनला या मागण्या मान्य नाहीत. ब्रिटनचे मुख्य वार्ताकार डेव्हिड फ्रॉस्ट यांची महासंघाचे प्रतिनिधी मायकल बर्नियर यांच्याशी मंगळवारी लंडनमध्ये 8 व्या टप्प्यातील चर्चा होणार आहे.
ब्रेक्झिट म्हणजे काय?
युरोपीय महासंघात 28 देशांची आर्थिक आणि राजकीय भागीदारी आहे. यांतर्गत या देशांमध्ये सामान आणि लोकांची बंधनमुक्त ये-जा होते. महासंघात राहिल्याने नुकसान होत असल्याचे ब्रिटनच्या नागरिकांना वाटत होते. महासंघाच्या सदस्यत्वासाठी ब्रिटनला दरवर्षी अब्जावधी पौंड द्यावे लागत होते. तसेच अन्य देशांचे लोक ब्रिटनमध्ये येत असल्याने रोजगाराच्या संधींवर परिणाम होत असल्याची भावना तयार झाली होती. याचमुळे ब्रिटनमध्ये जनमत चाचणीद्वारे महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.









