जगभरात 96,791 बळी : चिलीमध्ये हजारपेक्षा अधिक जणांना मिळणार विषाणूमुक्त प्रमाणपत्र
कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात 16,15,049 जणांना झाला असून 96,791 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना संकटाची तीव्रता अमेरिकेत सर्वाधिक दिसून येत आहे. अमेरिकेत 4,68,895 रुग्ण आढळले असून 16,697 जणांचा बळी गेला आहे. तर चिलीने संसर्गमुक्त झालेल्या लोकांना विषाणूमुक्त प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. चिलीमध्ये आतार्यंत 1 हजार 274 जण बरे झाले आहेत. प्रमाणपत्र प्राप्त करणाऱया लोकांना घरातून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. देशात 6 हजार रुग्ण सापडले असून 57 जणांना जीव गमवावा लागला आहे.
युरोपीय महासंघाचा पुढाकार
कोरोना संकटाला तोंड देणाऱया सदस्य देशांना युरोपीय महासंघाने 41 लाख कोटी (500 अब्ज युरो) देण्याची घोषणा केली आहे. ब्रुसेल्समध्ये युरोपीय महासंघाचे अध्यक्ष मॅरियो सेंटेनो यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. युरोपमधील स्पेनमध्ये सर्वाधिक संकट निर्माण झाले आहे. तेथे 15 हजारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत आर्थिक संकट
कोरोनामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तेथे सुमारे 1 कोटी 68 लोक बेरोजगार झाले आहेत. 10 पैकी 1 व्यक्ती कोरोनामुळे बेरोजगार झाल्याचे मानले जात आहे. रेस्टॉरंट आणि दुकाने बंद झाल्याने आवश्यक सामग्रीची टंचाई भासू लागली आहे. सरकारने फूड बँकेच्या माध्यमातून धान्य तसेच अन्नपदार्थ वाटण्यास सुरुवात केली आहे.
न्यूयॉर्कमध्ये 799 बळी
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये बळींचा आकडा शुक्रवारी 7 हजार 67 वर पोहोचला आहे. मागील 24 तासांत 799 जणांचा मृत्यू झाला असून केवळ 200 जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. लॉकडाउनपासून रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांची ही सर्वात कमी संख्या असल्याची माहिती गव्हर्नर क्युमो यांनी दिली.
शिकोगोतील कैद्यांना लागण
शिकागो येथील तुरुंगात 5 कैदी पॉझिटिव्ह आढळले आहेत. कुक काउंटी शेरिफ ऑफिसने आतापर्यंत 276 कैद्यांना लागण झाल्याचे सांगितले आहे. तर एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 172 कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. सुटका करण्यात आलेल्या कैद्यांना शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
इटलीत सर्वाधिक बळी
जगात सर्वाधिक बळी इटलीत गेले आहेत. इटलीत आतापर्यंत 18,279 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 143,626 जणांना लागण झाली आहे. यातील 28 हजार 470 जण बरे झाले आहेत. दिवसभरात आणखी 4 डॉक्टर्सचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टर्स फेडरेशनने दिली आहे. मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांचा आकडा आता 100 वर पोहोचला आहे.
फ्रान्समध्ये संकट वाढले
फ्रान्समध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या 12,210 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांमध्ये देशात 424 जणांनी जीव गमावला आहे. तर दिवसभरात 4334 नवे रुग्ण समोर आले आहेत. या कारणामुळे फ्रान्समधील एकूण रुग्णांची संख्या आता 1,17,749 वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे.
चीनमध्ये 42 नवे रुग्ण
चीनमध्ये 24 तासांमध्ये 42 नवे रुग्ण सापडले असून यातील 38 जण विदेशातून परतले आहेत. वुहान शहरात शुक्रवारी एक रुग्ण आढळला आहे. चीनमध्ये आता 81 हजार 907 रुग्ण झाले असून 3336 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 77 हजारांपेक्षा अधिक जण पूर्णपणे बरे झाले आहेत.
न्युझीलंडमध्ये दुसरा बळी
न्युझीलंडमध्ये कोरोनामुळे शुक्रवारी दुसरा बळी गेला आहे. 90 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासांमध्ये 44 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या 1283 झाली असून 373 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. गुरुवारी देशात 4520 जणांची चाचणी करण्यात आली आहे.
जपानमध्ये नवे निर्बंध
जपानमध्ये शुक्रवारी 57 नवे रुग्ण सापडल्याने सरकारने नवे निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. शनिवारपासून देशातील मोठे उद्योग बंद राहणार आहेत. चित्रपटगृह, क्रीडासंकुल, बार, इंटरनेट कॅफे, शॉपिंग मॉल, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. परंतु रेस्टॉरंट सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. यातही संध्याकाळी 7 नंतर मद्याची विक्री करता येणार नाही.
सुरक्षा परिषदेची बैठक
कोरोना रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ प्रमुख ऍण्टोनियो गुतेरेस यांच्या प्रयत्नांना साथ देणार असल्याचे सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी म्हटले आहे. कोरोनासंबंधी सुरक्षा परिषदेची पहिली बैठक शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पार पडली आहे. संकटात एकजूट आणि प्रतिबद्ध होऊन काम करावे लागणार असल्याचे गुतेरेस यांनी म्हटले.
- दक्षिण आफ्रिकेतील टाळेबंदीचा कालावधी 2 आठवडय़ांनी वाढविण्यात आला आहे. राष्ट्रीय कोरोना व्हायरस कमांड कौन्सिलने सद्यस्थितीचा विचार करून टाळेबंदी वाढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रपती सिरिल रॅमफोसा यांनी दिली.
- येमेनमध्ये शुक्रवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. हद्रामाउंट प्रांतात रुग्ण आढळल्याने आरोग्य अधिकाऱयांना सतर्क राहण्याचा निर्देश सरकारने दिल्याची माहिती कोरोना विषयक आपत्कालीन समितीने दिली.
- अमेरिकेत आतापर्यंत 20 लाख जणांची चाचणी करण्यात आली आहे. ही प्रक्रिया अत्यंत अचूकपणे पार पाडण्यात आल्याचे उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहेत. यापूर्वी त्यांनी व्यापक चाचणी शक्य नसल्याचे म्हटले होते.
- मागणी कमी झाल्याने उत्पादनात घट करण्याचा निर्णय ओपेकने घेतला आहे. संघटनेत सामील रशियासह अन्य देशांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटामुळे जगभरातील कच्च्या तेलाची मागणी प्रचंड प्रमाणात घटली आहे.
- ऑस्ट्रेलियाच्या सरकारने ईस्टरदिनी घरातून बाहेर न पडण्याची सूचना लोकांना केली आहे. लोकांवर नजर ठेवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड ठोठावण्यात येणार आहे.
- न्यूयॉर्कमध्ये मोठय़ा प्रमाणावर कोरोनाचे बळी गेल्याने तेथील दफनभूमीत जागा कमी पडू लागली आहे. या कारणामुळे आरोग्यकर्मचारी अज्ञात ठिकाणी मृतदेह दफन करू लागले आहेत. याची छायाचित्रेही प्रसारित झाली आहेत.
- सिंगापूरमध्ये शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरसिंग टूल जूमच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
- लॉकडाउनच्या पहिल्या आठवडय़ात याच्या उल्लंघनाची गंभीर प्रकरणे समोर आली आहेत. शाळांकडून होम बेस्ट लर्निंग ऍपचा वापर होत आहे.
- रशियात शुक्रवारी 1 हजार 786 नवे रुग्ण सापडले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एका दिवसात रुग्णांच्या संख्येत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. तेथील एकूण रुग्णांचा आकडा आता 11 हजार 917 झाला आहे. तर 94 बळी गेले आहेत.
- फिलिपाईन्समध्ये शुक्रवारी 119 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 4 हजार 195 झाली आहे. तर देशातील 16 जणांना कोरोनाच्या संसर्गापासून मुक्तता मिळाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
- दक्षिण कोरियाच्या डेगू शहरात शुक्रवारी एकही नवा रुग्ण सापडला नाही. मागील दोन महिन्यांमध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे. डेगू शहराला देशातील कोरोनाचा केंद्रबिंदू मानले जात होते. देशातील रुग्णांची संख्या 10 हजार 450 इतकी आहे.