रत्नागिरी/प्रतिनिधी
कवीला कोणत्या काळात काय लिहावे याचे पक्के भान पक्के असले की ‘युगानुयुगे तूच‘ सारख्या दीर्घ कवितेचे लेखन होते. कवी अजय कांडर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दीर्घ कविता लिहून समाजातल्या सर्व स्तरातल्या वर्गाने समतेच्या विचारावर एकत्र नांदायला पाहीजे असे आवाहन केले आहे. जाती धर्माच्या भिंती अधिक घट्ट करू पाहणाऱया या काळात ‘युगानुयुगे तूच‘ कवितासंग्रह नागरिकांच्या हातात देण्याची हीच ती वेळ आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांनी केले.
लोकप्रिय कवी अजय कांडर (कणकवली) यांच्या लोकवाड. मय गृह प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ‘युगानुयुगे तूच‘ या दीर्घ कवितासंग्रहाच्या पहिल्या व दुसऱया आवृत्तीचे प्रकाशन नीरजा यांच्या हस्ते सोमवारी झाले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे हा प्रकाशन सोहळा महाविद्यालयाच्या केळकर सभागृहात आयोजित करण्यात आला. कला शाखेच्या उपप्राचार्य प्रा डॉ. कल्पना आठल्ये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, ज्येष्ठ कवयित्री जयश्री बर्वे, कवी अजय कांडर, प्रा शिवराज गोपाळे आदी सहभागी झाले होते. यावेळी प्रा. डॉ. निधी पटवर्धन, प्रा. सीमा वीर, प्रा कांबळे, ललित लेखिका रश्मी कशेळकर, तरुण भारत रत्नागिरी आवृत्ती प्रमुख राजा खानोलकर, नितीन कानविंदे आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ कवयित्री नीरजा म्हणाल्या, विचार संपून टाकण्याच्या या काळात ‘युगानुयुगे तूच‘ सारखा दीर्घ कवितेचा संग्रह प्रसिद्ध होणे म्हणजे बाबासाहेबांच्या ‘माणसाकडून माणसाकडे‘ जाण्याच्या विचाराचं पुर्नजागरणच होय. आज देशातल्या विषमतेने टोक गाठले आहे. विषमतेची दरी संपवण्यासाठी बाबासाहेबांनी त्याकाळी बुद्ध विचारांना साद घातली. आजच्या काळात जात आणि धर्माची दरी संपवायची असेल तर आपल्याला बाबासाहेबांच्याच विचाराचे अनुकरण करावे लागते हे भान कांडर यांची ही कविता आपल्याला देते. पुढील काळात ‘युगानुयुगे तूच‘ हाच समाजाचा आधार असणार आहे. म्हणजेच बाबासाहेबांचे विचार घेऊन आपल्याला पुढील युगाकडे जावे लागणार असल्याचे त्या म्हणाल्या.
आजवर मराठी कवितेत बाबासाहेबांविषयी जे संदर्भ आले नाहीत असे अनेक संदर्भ या कवितेत बाबासाहेबांच्या विचाराचे आले आहेत. स्त्रियांच्या प्रश्नांसंदर्भात बाबासाहेबांनी अनमोल असे काम केले आहे. त्याचा आलेख या संग्रहात दीर्घ स्वरूपात मांडला गेला आहे. कामगार वर्ग असेल, शेतीचेप्रश्न असतील यासंदर्भात बाबासाहेबांनी केलेलं काम आपल्याला ‘युगानुयुगे तूच‘ या संग्रहातून वाचायला मिळते. खऱया अर्थाने ही आजची कविता आहे.
सचिन परब म्हणाले, युगानुयुगे तूच ही फक्त वैचारिक कविता नसून हे एक प्रगल्भ राजकीय विधान आहे. आजच्या समाजातील वाढत्या हुकुमशाहीच्या विरोधातला हा हस्तक्षेप आहे. कांडर यांची ‘हत्ती इलो‘ ही थेट राजकीय कविता होती. त्याचा पुढचा भाग ठरेल अशा या कवितेत वैचारिक मांडणीच्या अनेक व्यापक जागा आहेत. आजच्या काळातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज कवी कांडर यांनी अतिशय सोप्या भाषेत मांडली आहे. जी भाषा सर्वांना आपली वाटेल.
जयश्री बर्वे म्हणाल्या, आजच्या अस्वस्थतेतून ‘युगानुयुगे‘ तूच या कवितेची निर्मिती झाली आहे. ‘युगानुयुगे तूच‘ या संग्रहामुळे एक चांगली घटना मराठी साहित्यात घडली आहे. आंबेडकरांचा विचार सर्व वर्गापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणून या कवितेकडे आपण पाहायला हवे. आंबेडकरांच्या विचारांचे मर्म सांगताना कवी कांडर यांनी त्यांच्या विचारांची वाट आपल्याला पुन्हा एकदा दाखवली आहे
यावेळी प्रा डॉ. कल्पना आठल्ये यांनीही विचार मांडले. अजय कांडर यांनी या कवितेची निर्मिती प्रक्रिया उलगडून दाखवली. प्रा. गोपाळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.सीमा वीर यांनी सूत्रसंचालन केले. स्वागत प्रा डॉ निधी पटवर्धन यांनी केले.