मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील अनेक विद्यार्थी आणि इतर गोमंतकीय युक्रेनमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यासाठी गोवा सरकाने हेल्पलाईन जारी केली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला असून अनिवासी भारतीय विभागाचे संचालक ऍन्थॉनी डिसोझा (मोबाईल क्रमांक 9850926003) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी भारत सरकारने सुरु केलेल्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी अडकलेल्या गोमंतकीयांचा मार्गही सुकूर झाला आहे. युक्रेनमधील गोमंतकीयांनी तेथील भारतीय वकालतीच्या संपर्कात रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. युक्रेनमधून बाहेर पडणारे सध्या दोन मार्ग निश्चित करण्यात आले असून हंगेरी आणि रोमानियामार्गे भारतीयांनी आणण्याचे काम सुरू आहे. गोमंतकीयांनाही त्याच मार्गाने आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मदत केंद्रात गोमंतकीयांना व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली आहे.
भारत सरकारने मार्गदर्शक नियमावली जारी केली असून त्यात युक्रेनमधील भारतीयांनी भारतीय वकालतीच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे. तसेच जे लोक स्वतःच्या जबाबदारीवर प्रवास करीत आहे त्यांनी युक्रेनच्या सीमेवर चेन्नीवीस्ट येथील चेकपॉईंटच्या दिशने जावे, असेही म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून तत्परतेने पावले उचलली जात असून भारतीयांना सुखरूप परत आणले जाईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.









