मोटार ओनर्स असोसिएशनचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
ट्रकमध्ये भरलेले साहित्य लोडिंग व अनलोडिंग करण्यासाठी यापूर्वी ट्रक मालकांनाच हमाली द्यावी लागत होती. यामुळे ट्रकमालकांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होत होती. यामुळे यापुढे ज्याचा माल त्याचेच हमाल असतील. अन्यथा ट्रक रस्त्यावर येऊ देणार नाही, अशी भूमिका बेळगाव जिल्हा मोटार ओनर्स ऍण्ड एजंट्स असोसिएशनच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन मांडण्यात आली.
जिसका भाडा उसका हमाल, ही राष्ट्रीय स्तरावर मोहीम सुरू आहे. ही मोहीम आता बेळगाव जिल्हय़ातही राबविली जाणार आहे. यापुढे ज्याचे भाडे त्यालाच हमाली द्यावी लागणार आहे. यापूर्वी ही हमाली लॉरी मालकांना द्यावी लागत असल्याने त्यांना आर्थिक तोटा होत होता. यामुळे व्यावसायिक मात्र आर्थिक फायदा उचलत होते. बेळगावसह गुलबर्गा, दावणगेरी, हुबळी येथेही या महिन्यापासून ही नवीन प्रणाली लागू केली आहे. बेळगाव जिल्हय़ातही याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ए. ए. पाच्छापुरी, जे. एस. कुडचीकर, स्वरुप कलडगी, एस. ए. जामदार, गौस शेख, किरण पाटील, अशोक कडाले, लखन राजाई, राजू तुबजी, शिवाजी लमाणी, अमित राजाई, रवी हलकर्णीकर, चेतन पाटील, मिलिंद डांगे, वैभव पाटील, सुरेश चव्हाण, शिवाजी पट्टेकर, शट्टूप्पा गावडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.









