कृष्ण रुक्मिणी विवाहासाठी विलक्षण सामग्री सज्ज करण्यात आली होती. विविध वस्त्रे होती, चिद्रत्नांचे अलंकार होते. अहंकाराचे बीज भरडून, मोहममतेचा कोंडा काढून, सोलीव डाळीची दुरडी श्रद्धेने भरली होती. विवेक चाळणीने चाळून स्वानंदाची गोड कणिक सज्ज करून ठेवली होती. परिपक्व होऊन देठातून सुटलेली मधुर फळे आणली होती. सुंदर सुवासिक फुलांचे हार तयार केले होते. सौभाग्यद्रव्यात सद्बुद्धी विवेकाचे जिरे मिसळले होते. कृष्णवर्णाचे अत्यंत गोड ऊस आणले होते. गाठी सोडून त्या धाग्यात कृष्णमणी ओवून रुक्मिणीसाठी गळसरी तयार केली होती.
फळ विस्तारले प्रबळ । यादव शृंगारले सकळ। भेरी त्राहाटिल्या मांदळ । निशाणें ढोल लागले। अनर्घ्य लुगडीं आणि लेणीं । लेऊनि निघाल्या वऱहाडिणी। चारी बारा सोळाजणी । चौघीजणी तयांपुढें । जीवशिवां वडिल मान । तैसे वसुदेव उग्रसेन। संतोषोनि संकर्षण । करी परिपूर्ण याचकां। एका दिधलें कांहीं एक । एका दिधलें अनंत सुख। चिदरत्नें अलोलिक। देऊनि याचक सुखी केले । फळ चालिलें गजरें । ढळती रत्नदंड चवरें । झळकती पालवछत्रें। दशविध तुरें वाजती । जैसी श्रद्धा आणि शांती । तैसी सुभद्रा आणि रेवती । मुख्यपणें माजी मिरविती। घेतल्या बुंथी पाचूच्या।नानापरिंच्या घेतल्या बुंथी। तरी अंतरशोभा बाह्य फांकती । अलंकारल्या निजवृत्ती। त्या न झांकती झाकिल्या । वरपक्ष मंडपाकडे निघाला. त्यावेळी यादवांचे सारे वैभव तिथे अवतरले होते. रस्ता पायघडय़ांनी झाकला होता. वाद्ये मंजुळ वाजत होती. चपळ, सुंदर व तेजाळ असे अश्वदळ थयथय नाचत होते. घोडय़ांच्या पायातील सोन्याचे तोडे खळखळ वाजत होते. हत्ती सुशोभित होते. त्यांच्या पाठीवर भरतकाम केलेल्या झुली होत्या. गजदंतावर सुवर्णाचे आवरण होते. हत्तीच्या गळय़ातील घंटा वाजत होत्या. त्यांच्या पायातील साखळय़ा खळखळत होत्या. त्यांच्या सोंडा सुंदर चित्रकृतींनी रंगवल्यामुळे मोहक दिसत होत्या. त्यावर अंबारीत यादववीर बसले होते व ते चामरे ढाळत होते. सेवकांच्या व दासींच्या अंगावर इतके अलंकार होते की ही दासी आहे की करवली हे ओळखू येत नव्हते. पालख्या, मेणे, घोडे, रथ, हत्ती यावरून वऱहाड चालले होते. वराबरोबर चाललेल्या यादव स्त्रिया, कुमारिका जणू देवांगना दिसाव्यात अशा शोभत होत्या. त्यांनी इतका शृंगार केला होता की त्या जणू शृंगारवनीच्या कुळदेवता अवतरल्याप्रमाणे दिसत होत्या. नारिंच्या सुहास्य मुखांना पाहून जणू सूर्य ढगाआड लपला होता. अष्टसात्त्विकभाव सेवकांच्या रूपाने कृष्णाबरोबर चालले होते. वराच्या मस्तकावर निदबोधाचे छत्र धरले होते. चंद्रकिरणांप्रमाणे शुभ्र चवऱया ढाळल्या जात होत्या. ब्राह्मण सामगायन करीत होते. बंदीजन कृष्णकीर्ती गात होते. वैष्णव भजनात दंग होऊन नाचत होते. कृष्णाबरोबर शांति, क्षमा, दया, उन्मनी इत्यादि सुवासिनी चालल्या होत्या. सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता मुक्तीरूपी सुवासिनी त्याच्या पुढे चालल्या होत्या.
Ad. देवदत्त परुळेकर