ऑनलाईन टिम / लखनऊ
वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावलेल्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये क्लिक केलेल्या एका फोटोमुळे उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. समाजवादी पार्टीचे सुप्रिमो मुलायमसिंह यादव यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतांसोबतच्या फोटोमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या फोटोवर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर कॉंग्रेस पक्षाने असे म्हटले आहे की हे एका नवीन सपाचे प्रतिबिंब आहे ज्यामध्ये ‘एस’ म्हणजे ‘संघवाद’ आहे. यामध्ये मुलायम यांनी भागवतांना ‘आशीर्वाद’ दिला का, असा प्रश्न काँग्रेस पक्षाला पडला आहे. ट्विटमध्ये पुढे असे म्हटले आहे की ‘समाजवादी पक्षाचे आभार. हेच आम्हाला जाणून घ्यायचे होते की सपाचे सुप्रिमो मुलायम सिंह यादव यांनी मोहन भागवत यांना आशीर्वाद दिला आहे की नाही. राज्यातील जनतेला हे स्पष्ट केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद,” असे यूपी काँग्रेसच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.









