ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
गूगल, फेसबुक आणि ट्विटर या दिग्गज टेक कंपन्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान सोडून जाण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानची सध्याची डिजिटल सेन्सॉरशिप हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट हल्ला आहे, असा इशारा आशिया इंटरनेट युतीने पाकिस्तान सरकारला दिला आहे.
आशिया इंटरनेट युती ही संस्था आशियातील गुगल, फेसबुक आणि ट्विटरसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते. इस्लामी राष्ट्रातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य रोखण्याच्या हेतूने पाकिस्तान सरकारने डिजिटल कंटेंट सेन्सॉर करण्याचा अधिकार सरकारला दिला आहे, असे आशिया इंटरनेटचे मत आहे. जर पाक सरकारने आपल्या नियमांमध्ये सुधारणा केली नाही तर या कंपन्या पाकिस्तान सोडून जातील.
दरम्यान, पाकिस्तानात लागू करण्यात आलेल्या डिजिटल सेन्सॉरशिप कायद्याने आक्षेपार्ह मजकुरासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर कंपन्यांना काढून टाकण्याची विनंती करू शकते. या कंपन्यांना आवाहनानंतर 24 तासांच्या आत कंटेंट काढून टाकावा लागेल, तर आपत्कालीन परिस्थितीत ही मर्यादा 6 तासांची असेल.