प्रसंगी चाहत्यांशिवाय स्पर्धा घेण्यासाठी देखील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा आटापिटा, चाहत्यांचा मात्र हिरमोड निश्चित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यंदाची इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धा वेळप्रसंगी जुलैमध्ये आणि जुलैमध्येही शक्य न झाल्यास हिवाळय़ात तरी खेळवण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा विचार आहे. सध्याच्या घडीला ही स्पर्धा दि. 14 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकली गेली असून लवकरच कार्यकारिणीला पुढील निर्णय जाहीर करावा लागणार आहे. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, ही स्पर्धा दि. 29 मार्चपासून खेळवली जाणार होती.

सध्याच्या घडीला बीसीसीआय फक्त थांबा व प्रतीक्षा करा या भूमिकेत आहे. पण, कोरोना व्हायरसचा प्रकोप अद्यापही थांबण्याची चिन्हे नसल्याने अडचणीत भरच पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल डिस्टन्सिंगचा उपाय कडक अंमलात आणला जावा, यासाठी 21 दिवसांचा राष्ट्रव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. हे लॉकडाऊन दि. 14 एप्रिलपर्यंत आहे. पण, आतापर्यंतचे एकंदरीत चित्र पाहता, लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
जर लॉकडाऊन वाढवला तर आयपीएल स्पर्धा पूर्ण खेळवली जाणे कठीण असेल, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने यावेळी नमूद केले. आयपीएल स्पर्धा रद्द झाली तर बीसीसीआय व संलग्न घटकांचे सर्वसाधारणपणे 3800 कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे संकेत आहेत.
‘यंदा जर आयपीएल स्पर्धा झाली नाही तर मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागेल, हे साहजिक आहे. पण, ते नुकसान किती असेल, याचा आताच अंदाज वर्तवणे कठीण आहे’, असे चेन्नई सुपरकिंग्सचा प्रवक्ता म्हणाला.
विश्वचषक स्पर्धा लांबणीवर गेली तरच आयपीएल ऑक्टोबरमध्ये
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयपीएल स्पर्धा वेळप्रसंगी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भरवण्याविषयीही गांभीर्याने विचार करत आहे. पण, आयसीसीने ऑक्टोबरमधील टी-20 विश्वचषक लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला तरच आयपीएल ऑक्टोबरमध्ये खेळवणे शक्य होईल. सध्याच्या रुपरेषेनुसार, यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा दि. 18 ऑक्टोबर ते दि. 15 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
बंदिस्त आयपीएलला काहीच अर्थ नाही : मदनलाल

एकदा कोरोना व्हायरस निघून गेल्यानंतर क्रिकेट पूर्ववत सुरु होईल. प्रेक्षक स्टेडियमपर्यंत पोहोचतील. पण, तोवर प्रेक्षकांशिवाय, आयपीएल स्पर्धा खेळवण्यात काहीच हशील वाटत नाही. त्याऐवजी, परिस्थिती सुधारण्याची प्रतीक्षा करणे अधिक योग्य ठरेल, असे मदनलाल यांनी शुक्रवारी नमूद केले.
आयपीएल हा मोठा ब्रँड आहे. पण, एकदा परिस्थिती सुधारली की त्यानंतरच मंडळाला ठोस निर्णय घेता येईल. सध्याच्या घडीला कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. त्यामुळे, आता कोणीही धोका स्वीकारु शकत नाही, असे ते म्हणाले.
चाहते हा कोणत्याही खेळाचा प्राण असतात आणि क्रिकेट त्याला अपवाद नाही. त्यामुळे, ही स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्याने काहीच साध्य होणार नाही, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला. अलीकडेच ऑफस्पिनर हरभजन सिंग व पॅट कमिन्स यांनी चाहत्यांशिवाय आयपीएल खेळवण्याची सूचना केली होती. त्या पार्श्वभूमीवर मदनलाल बोलत होते.









