कोल्हापूर / प्रतिनिधी
२०२०-२१ हंगामामध्ये महाराष्ट्र ११० लाख टनाचे साखर उत्पादन करून यंदा देशात प्रथम क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राने १८४ साखर कारखान्यांनी १५ डिसेंबरपर्यंत सर्वाधिक म्हणजे ३१.९० लाख टनाचे उत्पादन केले असून हे यंदाचे उत्पादन विक्रमी असणार आहे.
१५ डिसेंबर २०२१ पर्यंत देशात ७५ लाख टनापेक्षा अधिक साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असून चालू गळीत हंगामाअखेर ते ३१५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. हे उत्पादन देशभरातील ४७१ साखर कारखान्यांतून झाले असून त्यातील महाराष्ट्रात एकूण १८२ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. यामध्ये ९१ सहकारी तसेच ९१ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशाचा क्रमांक असून तेथील ११७ साखर कारखान्यांत १८.६० लाख टनाहून अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे तर हंगामाअखेर ते १०७ लाख टन होण्याचा अंदाज आहे. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून या राज्यातील ६९ साखर कारखान्यांतून १७.९० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. ते हंगाम अखेर ४८ लाख टनाचा साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने म्हटले आहे.