वेळास कासव संवर्धन प्रकल्पाचे 16 व्या वर्षात पदार्पण
चिपळूण येथील निर्सग मित्र संस्थेच्या माध्यमातून वेळास येथे 2005 साली कार्यान्वित केलेल्या कासव संवर्धन प्रकल्पाने यंदा सलग 16 व्या वर्षात प्रवेश केला आहे. हा सागरी कासव संवर्धन प्रकल्प ऑलिव्ह रिडले या प्रजातींच्या कासवांना नवसंजीवनी देणारा ठरला आहे. यंदा राबवण्यात आलेली मोहीम या प्रकल्पाच्या स्थापनेपासूनच्या वर्षापासून सर्वात यशस्वी मोहीम ठरली आहे. यंदा 44 घरटय़ात एकूण 4818 कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. यातील 2150 पिल्लांना समुद्रात सोडण्यात यश आले आहे.
निसर्ग चक्रीवादळानंतर तालुक्यात दाखल झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा कोकण सागरी किनाऱयावरील सर्वच प्रकल्पांना फटका बसला. मात्र वेळास येथील समुद्रकिनारी असलेल्या प्रकल्पातील केवळ एकाच घरटय़ाचे थोडे नुकसान झाले आहे. अजूनही शिल्लक असलेल्या घरटय़ांमधून मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत पिल्ले समुद्रात जाण्याची शक्यता आहे. स्थानिक कासव मित्र व वनविभाग मंडणगड प्रकल्पावर पूर्ण लक्ष ठेवून आहेत. वन्यजीव अभ्यासक भाऊ काटदरे यांनी पुढाकार घेऊन सुरु झालेल्या या मोहिमेने वेळास गावासह तालुक्याला वेगळी ओळख दिली आहे.
आता येथे कासव संग्रहालयाचा प्रकल्प प्रस्थापित आहे. गत 2 वर्षात वातावरणात झालेले बदल या मोहिमेच्या पथ्यावर पडले आहेत. सुरुवातीस ही मोहीम चिपळूण येथील संस्था राबवत होती. नंतर मात्र ग्रामपंचायत व ग्रामस्थांना या बाबत जागरुकता दाखवून या मोहिमेचे संचालन स्वतःकडे घेतले आहे. सागरात जाणाऱया पिल्लाची संख्या बघता ही मोहीम स्थानिकांच्या माध्यमातून यशस्वीपणे चालवली जात आहे, असा निष्कर्ष निघत आहे. कासवांच्या जीवनचक्रांचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक या गावास दरवर्षी भेट देतात.
तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम नाही ः अनंत मंत्री
स्थानिक वनविभागाचे वनरक्षक अनंत मंत्री म्हणाले की, यंदाच्या मोहिमेला तौक्ते चक्रीवादळाचा फारसा फटका बसलेला नाही. केवळ एका घरटय़ाचे नुकसान झाले आहे. अजूनही घरटय़ांतून पिल्ले सोडण्याची प्रक्रिया सुरु आहे. वनविभाग सर्व घडामोंडीवर बारीक लक्ष ठेवून आहे.









