प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा, ज्ये÷ नागरिकांना प्रवासबंदी, याबरोबरच यात्रा, जत्रा, उत्सव, लग्न आणि सहलींतून मिळणाऱया उत्पन्नाला बेक लागला आहे. प्रामुख्याने नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान अनेक जण पर्यटनस्थळ व शैक्षणिक सहलींचे आयोजन करत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे पर्यटनस्थळांबरोबरच शालेय सहलीही थांबल्या आहेत. त्यामुळे यंदा परिवहनच्या व्यावसायिक हंगामावर पाणी फिरले आहे.
दैनंदिन वाहतुकीबरोबर परिवहनला लग्न, शालेय सहली, यात्रा यातून चांगले उत्पन्न मिळते. मात्र अद्याप शाळाच बंद असल्याने सहलीबरोबरच विद्यार्थ्यांच्या पासमधून मिळणारा महसूलदेखील थांबला आहे. आधीच कोरोनामुळे परिवहनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच परिवहनचा नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंतचा क्यावसायिक हंगामही वाया गेल्याने तोटय़ात भर पडली आहे.
परिवहनच्या विशेष बस नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान विविध मार्गांवर धावतात. त्याचबरोबर नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान शालेय सहलींचा हंगाम सुरू असतो. या काळात शाळांतून आयोजन करण्यात येणाऱया सहलींसाठी प्रामुख्याने बसचा वापर केला जातो. दररोज 15 हून अधिक बसेस सहलींसाठी विविध ठिकाणी धावतात. त्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांमध्ये परिवहनच्या उत्पन्नात वाढ होते. या सहलींच्या माध्यमातून लाखो रुपयांचा महसूल मिळायचा. मात्र अद्याप शाळाच बंद असल्याने शालेय सहलींतून मिळणाऱया उत्पन्नावर पाणी फिरले आहे.
पर्यटनस्थळे बंदचा फटका
विशेषतः नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत पर्यटनस्थळांना भेटी देणाऱया पर्यटकांची संख्या अधिक असते. त्यामुळे राज्यातील बेंगळूर, म्हैसूर, विजापूर, श्रवणबेळगोळ यासह महाराष्ट्रातील महाबळेश्वर तर गोव्याला जाणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. मात्र यंदा कोरोनामुळे अनेक ठिकाणची पर्यटनस्थळे बंद असल्याने पर्यटकांची संख्या घटली आहे. त्यामुळे परिवहनला नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंतच्या हंगामात मिळणाऱया उत्पन्नापासून वंचित रहावे लागले आहे.









