पाऊस, बदलत्या हवामानाचा परिणाम : बागायतदारांना फटका
प्रतिनिधी / बेळगाव
दरवषी मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात बाजारात दाखल होणाऱया फळांच्या राजाला यंदा उशिर झाला आहे. किरकोळ बाजारात आंबा दिसत असला तरी आवक मात्र कमीच आहे. अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे म्हणावा तसा आंबा बाजारात दाखल झाला नाही.
मार्च पहिल्या आठवडय़ापासून आंबा लागवडीला प्रारंभ होतो. त्यानंतर कच्च्या कैरी आणि विविध जातीचे आंबे बाजारात विक्रीसाठी दाखल होतात. मात्र यंदा आंब्याची आवक मंदावलेली दिसत आहे. राज्यातील कोलार, रामनगर, बेंगळूर ग्रामीण, चिक्क बेल्लापूर, बेळगाव, धारवाड जिल्हय़ासह इतर भागात आंब्याचे उत्पादन होते. तब्बल दोन लाख हेक्टर क्षेत्रात आंब्याचे उत्पादन होते. मात्र यंदा उत्पादनात घट झाली आहे.
दरवषी तोतापुरी, रसपुरी, निलम, बदामी, हापूस, कलमी आदी जातीच्या आंब्यांचे जवळपास 12 ते 15 लाख टन उत्पादन होते. त्या तुलनेत यंदा केवळ 5 ते 6 लाख टन उत्पादन होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे तब्बल 6 लाख टन उत्पादनात घट होण्याची भिती व्यक्त होत आहे.
हेक्टरी 3 ते 4 टन उत्पादन
दरवषी हेक्टरी सरासरी 8 ते 10 टन उत्पादन होत होते. मात्र यंदा त्यात घट झाली असून हेक्टरी 3 ते 4 टन उत्पादन होत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना देखील फटका बसला आहे.
पावसामुळे लागवड कमी
अवकाळी पाऊस, किडीचा प्रादुर्भाव आणि बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे हेक्टरी उत्पादनात घट झाली आहे. शिवाय पावसामुळे लागवड कमी झाली आहे. त्यामुळे हेक्टरी 3 ते 4 टन उत्पादन घटले आहे.