शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांची माहिती
बेंगळूर : राज्यात यंदा 8 लाख 51 हजार विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली. बेंगळूरमध्ये समग्र शिक्षण कार्यालयात दहावी परीक्षेसंदर्भात ‘यशोगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. कोरोना परिस्थितीतही देशाला आदर्श ठरेल अशा पद्धतीने राज्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षातही हे आव्हान आपल्यासमोर आहे. 2021 च्या दहावी परीक्षेसाठी राज्यभरातून 8.51 लाख विद्यार्थी बसणार आहेत. मागील वर्षी 8.48 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 3 हजार अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. दहावी परीक्षेचे तात्कालिक वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून 25 फेब्रुवारीनंतर अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.









