प्रतिनिधी/ म्हापसा
सरकारच्या आदेशानुसार उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाने म्हापसा शहराच्या नियोजन क्षेत्रातील भू-वापर नकाशा व भू-वापर रजिस्ट्रार आराखडा तयार केला होता. या नकाशासंबंधी सूचना व हरकती घेण्यासाठी म्हापसा नगरपालिका मंडळाची खास बैठक आज दि. 9 रोजी सकाळी पालिका सभागृहात होऊन या बैठकीत मागच्या काही महिन्यापासून गाजत असलेल्या कुचेली मैदानावर चर्चा होऊन म्हापसा शहराच्या प्राधिकरणाने तयार केलेल्या आराखडय़ात कुचेली मैदान न दाखविल्याने काही नगरसेवकांनी हरकत घेऊन म्हापशाचे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांना बरेच धारेवर धरले. व आराखडय़ात कुचेली येथील फुटबॉल व क्रिकेट मैदान गहाळ झाले आहे ते पुन्हा आराखडय़ात दाखवावे अशा एकच मागणीवर जोर धरला. जेणेकरून नगराध्यक्षांनी नगरसेवकांच्या सूचनेवरून या बैठकीत कुचेली येथील दोन्ही मैदाने आराखडय़ात दाखविण्यात येईल असे आश्वासन दिल्यावर सर्वानुमते हा ठराव एकमताने संमत करण्यात आला.
नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्या अध्यक्षतेखाली पालिका बैठक पार पडली. बैठकीला आमदार तथा नगरसेवक जोशुआ डिसोझा, उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाचे सदस्य सचिव आर. पंडिता, पालिका मुख्याधिकारी कबिर शिरगावकर, उपनगराध्यक्ष श्रीमती मर्लीन डिसोझा व इतर नगरसेवक उपस्थित होते. कुचेली येथील कोमुनिदादच्या जमिनीत गेली अनेक वर्षे कुचेली परिसरातील तरुण फुटबॉल व क्रिकेट खेळत होते. अचानक कुचेली कोमुनिदादने या जागेवर बांधकाम करण्याचे ठरविले आहे. या प्रकाराविरोधात म्हापशातील अनेक क्रीडाप्रेमी आवाज उठवित आहेत. या आवाजाला आज प्रत्यक्ष म्हापसा नगरपालिकेतील अनेक नगरसेवकांनी पाठिंबा देत प्राधिकरणाने तयार केलेल्या नियोजन आराखडय़ातून एक मैदान गायब केले आहे. मागच्या 2011 च्या आराखडय़ात कुचेली येथील जागा राखीव दाखविण्यात आली होती त्या पद्धतीने या नवीन तयार केलेल्या भू-वापर नकाशा व भूöवापर रजिस्टरमध्ये पुन्हा या दोन्ही मैदानाचा समावेश करावा अशी सूचना नगरसेवक चंद्रशेखर बेनकर, नगरसेवक संदीप फळारी, नगरस्वक राजसिंग राणे, नगरसेवक तुषार टोपले, नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी मांडली व विद्यमान आराखडय़ाला या नगरसेवकांनी कडकडून विरोध केला. नगरसेवक चंद्रशेखर बेनकर यांनी या नवीन आराखडय़ात मैदानाचा समावेश करावा असा ठराव मांडला व तो एकमताने संमत झाला.
म्हापसा शहराच्या नियोजन क्षेत्रातील भू-वापर नकाशा व भू-वापर रजिस्ट्रार आराखडा तयार करण्यास आला आहे या नकाशासंबंधी सूचना व हरकती घेण्याचा उद्या दि. 10 सप्टेंबर हा शेवटचा दिवस असल्यामुळे नगरसेवक व म्हापशातील जनतेला हरकती व सूचना करण्यासाठी आणखीन 15 दिवसाची मुदतवाढ देण्याची सूचना नगरसेवक तुषार टोपले यांनी मांडली. मागच्या महिन्यात गणेश चतुर्थीचा सण आला तसेच कोरोना महामारीचा काळ चालू असल्यामुळे मुदतवाढ देण्याची सूचना केली त्यावर नगरसेवक संदीप फळारी, राजसिंग राणे, मार्टीन कारास्को व स्वप्नील शिरोडकर, सुधीर कांदोळकर यांनी आग्रह धरला. त्यानंतर 15 दिवसांची हरकती व सूचना मांडण्यासाठी मुदतवाढ उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाने देण्यासंदर्भात ठराव मांडला गेला व तो ठराव एकमताने संमत झाला.
प्राधिकरणाचे सदस्य सचिव आर. पंडिता यांनी भू- वापर नकाशा व भू-वापर रजिस्ट्रार सर्व नगरसेवकांना दाखविला व त्यांनी आपल्या लेखी स्वरुपात हरकती व सूचना मांडण्याच्या सूचना केल्या. तसेच म्हापसा शहरातील प्रत्येक वॉर्डानुसार आपण चर्चा करण्यास तयार आहे असे त्यांनी सांगितले. नकाशावर सर्व नगरसेवकांनी अभ्यास करावा व शक्य असल्यास आपल्या वॉर्डाचा छोटासा नकाशा तयार करून हरकती किंवा सूचना कराव्यात असे त्यांनी सांगितले. म्हापसा शहराच्या नियोजन क्षेत्रातील भू-वापर नकाशा व भू-वापर रजिस्ट्रार या आराखडय़ावर सूचना व हरकती आल्यानंतर पुन्हा आराखडा तयार केल्यानंतर नगरपालिकेकडे ठेवण्याचे आश्वासन आजच्या बैठकीत सदस्य सचिव पंडित यांनी दिले. आजच्या बैठक दोन तास चालली. शहराच्या आराखडय़ावर सखोल चर्चा झाली. बैठकीला तीन नगरसेवक अनुपस्थित होते.
कुचेली कोमुनिदादने मागच्या अनेक वर्षापासून क्रीडाप्रेमी फुटबॉल व क्रिकेट खेळत असलेल्या जागेवर बांधकाम सुरू केले आहे. या कोमुनिदादच्या कृतीला उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाने परवानगी दिली आहे त्यानंतर नगराध्यक्षांनी स्थानिक नगरसेवक किंवा ज्येष्ठ नगरसेवकांना विश्वासात न घेता मुख्याधिकाऱयांना बांधकाम परवाना देण्यास मान्यता दिल्यामुळे पालिकेतील काही ज्येष्ठ नगरसेवक व स्थानिक नगरसेवक नाराज झाले आहे. अशा प्रकारची नाराजी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
बॉक्स करणे
आजच्या खास बैठकीला उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी या नवीन आराखडय़ाविषयी आम्हाला नगराध्यक्षांनी अंधारात ठेवले असा सूर लावल्यानंतर माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संदीप फळारी यांनी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्यासमोर सांगितले की, आपण 7 ऑगस्ट पासून नगराध्यक्षांना पालिकेची खास बैठक घेण्याची सूचीत करीत होतो मात्र ते याकडे गंभीर नव्हते असे सांगून नगराध्यक्षांना सर्वांच्या समोर उघडे पाडले.
बॉक्स करणे
कुचेली मैदान प्रकरण म्हापसा शहरात आंदोलनाचे रूप धारण करीत आहे पण मागच्या काही दिवसांपासून आमदार, नगराध्यक्ष व इतर नगरसेवकांनी तोंड बंद ठेवले होते पण आज प्रत्यक्षात म्हापसा शहराच्या भू-वापर नकाशाच्या आराखडय़ावर चर्चा झाली तेव्हा आठ नगरसेवकांनी या मैदानासंदर्भात आवाज उठविला व हरकत घेऊन पुन्हा नवीन आराखडय़ात कुचेली मैदानाचा समावेश करण्याची सूचना केली. पण म्हापसा मतदारसंघाचे आमदार तथा नगरसेवक जोशुआ डिसोझा यांनी या बैठकीत कुचेली मैदान प्रकरणी बैठकीच्या शेवटपर्यंत भ्र काढला नाही त्यामुळे आमदाराच्या भूमिकेविषयी उपस्थित पत्रकार व नगरसेवकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला.









