प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा येथे शनिवारी होणारी अल्पसंख्यांकाची खास बैठकीला म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकाऱयांनी परवानगी नाकारल्याने शनिवारी संध्याकाळी म्हापशात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सभास्थळी सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपअधिक्षक गजानन प्रभुदेसाई, हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरज गांवस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र कडक पोलीस पहारा ठेवण्यात आला होता. त्यामुळे म्हापसा टॅक्सी स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.
अल्पसंख्यांक नागरिकांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयका विरोधात खास बैठकीचे आयोजन केले होते. त्यासाठी चार दिवसपूर्वीच परवानगी घेतली होती. सभेचे तयारी सुरु असताना राजकीय दबावावरुन मुख्याधिकारी मदेरा यांनी सभेची परवानगी नाकारली. त्यामुळे अल्पसंख्यामध्ये नाराजीचा व संतापाची लाट पसरली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत अल्पसंख्याक म्हापसा पोलीस स्थानकात ठाण मांडून होते. अखेर त्यांना पोलिसांनी समज दिल्यावर ते माघारी फिरले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मात्र कोणीच फिरकले नसल्याचे उपअधिक्षक गजानन प्रभुदेसाई यांनी सांगितले.









