प्रतिनिधी/ म्हापसा
एका बाजूने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दुकाने खुली करण्याचा आदेश दिला असला तरी त्याचा फायदा घेत नागरिक दुकानावर खरेदी करण्यासाठी जातो, औषधालयामध्ये जातो असे सांगून म्हापसा बाजारपेठेत फेरफटका मारण्यासाठी येतात. याची दखल घेऊन उत्तर गोवा पोलीस अधीक्षक प्रसन्नू यांनी म्हापशात शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. नाहक बाजारपेठेत येणाऱयांवर कारवाई करावी असा आदेश म्हापसा पोलिसांना दिला आहे.
अधीक्षकांसमवेत उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई, निरीक्षक तुषार लोटलीकर आदी पोलीस वर्ग उपस्थित होता. केंद्रिय राखीव दलाचे पोलीस डय़ुटीवरून काढले असले तरी शुक्रवारी मात्र म्हापशात पोलीस स्थानकाजवळ, गांधीचौक सर्कल जवळ केंद्रिय राखीव दलाचे पोलीस वर्ग पुन्हा पहारा देताना पहायला मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी म्हापशात कडक पोलीस बंदोबस्त सुरू होता.
म्हापसा बाजारपेठेत अवघे सहाच किराणा सामानाची दुकाने उघडी होती. नागरिकांनी त्या दुकानावर जाऊन आपल्या जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या. शिवाय बाजारपेठेत पोलीसही फिरताना पहायला मिळाले. नाहक आतमध्ये जाणाऱयांना डय़ुटीवरील पोलीस हाकलून देत होते मात्र हे ना ते कारण पुढे करून दुचाकीवाले म्हापसा परिसरात फिरताना पहायला मिळाले. अशा फिरणाऱयांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी म्हापसा वासियांनी केली आहे.
म्हापशात सर्वत्र भाजीच भाजी
दरम्यान आठ दिवसापूर्वी अचानक जनता करफ्यू आणि त्यानंतर 21 दिवस पूर्णतः लोकांकडून केल्यामुळे राज्यात भाजीचा तुटवडा झाला. म्हापशात तर काही बिगर गोमंतकीयवाल्यांनी तीप्पट दराने कांदे, बटाटे आणि भाज्यांची विक्री केली. मात्र या दोन दिवसात बेळगाव आदी नजिकच्या ठिकाणाहून अनेकांनी भाजी आणून म्हापशात विक्री केली. सध्या म्हापशात 100 मीटरच्या वाटेवर रस्त्याच्या बाजूला अनेकजण भाजी विक्री करताना पहायला मिळत आहे. भाजी खाऊन बार्देश वासियांबरोबर म्हापसा वासीयही सुखावले आहेत. आता भाजीचा दर स्थिरावला आहे. शिवाय बार्देशातील काही आमदार मंत्र्यांनी भाजीचे ट्रक आणून भाजी स्वस्त दरात वितरीत केल्याने सर्वांनी पुरेल अशी भाजी घेऊन ठेवली आहे. खोर्ली येथील सुपर कॉलिटी बझारमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी कांदे, बटाटे 20 रुपये प्रति किलो या भावाने उपलब्ध आहेत बॉक्स करणे
यांना कायदा (आदेश) लागत नाही काय?
उत्तर गोवा पोलीस अधीक्षक आयपीएस उत्कर्ष प्रसन्नू शुक्रवारी म्हापशात येऊन त्यांनी सर्वत्र कायदा सुव्यवस्थेची पाहणी केली. दुचाकीवरून नाहक फिरणाऱयांची चौकशीही केली. त्यांच्यासमवेत उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई, पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर उपस्थित होते. अधीक्षक प्रसन्नू वगळता सर्वांनी तोंडाला मास्क परिधान केले होते. आयपीएस अधीक्षक प्रसन्नू हे मात्र तोंडाला मास्क न घालता सर्वत्र खुलेआम फिरताना पहायला मिळाले. कोरोनाची लागण त्यांना होऊ शकत नाही काय? वा त्यांना कायदा आदेश लागत नाही काय? अशी एकच चर्चा म्हापशात पाहणीअंती दिसून आली.









